गोवा

गोवा : दिगंबरना कौल नाहीच; मुख्यमंत्र्यांची शिष्टाई निष्फळ : मडगावमध्ये विजयची खेळी जिंकली

मोहन कारंडे

मडगाव; पुढारी वृत्तसेवा : सतरा वर्षे काँग्रेसमध्ये राहून नानाविध प्रकारची सत्ता भोगल्यानंतर भाजपवासी झालेले माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत मडगाव पालिकेत नगरसेवकांचा कौल मिळवू शकले नाहीत. देवाने मला सांगितले म्हणून मी भाजप प्रवेश केला, तू जो निर्णय घेशील त्याच्या पाठीशी मी आहे, असे देवाने मला सांगितले, असे म्हणणारे दिगंबर नगरसेवकांचा 'कौल' मात्र मिळवू शकले नाहीत.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून सुद्धा मडगाव नगरपालिकेवर त्यांना भाजपचा झेंडा फडकवता आला नाही. भाजप आणि दिगंबर कामत गटातील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दामोदर शिरोडकर यांना 15 मते देऊन नगराध्यक्षपदी निवडून आणण्याचे दगंबर यांचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले. ऐन वेळी भाजपात बंडखोरी झाली. तर अनपेक्षितरीत्या फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी अपक्ष उमेदवार घनश्याम शिरोडकर यांना पाठिंबा दिला. त्यामुळे मडगाव नगरपालिकेवर दामू शिरोडकर यांना पराभूत करून घनश्याम शिरोडकर 15 विरुद्ध 10 मतांनी निवडून आले. निवडणूक अधिकारी श्रीनित कोठवाळे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. नगराध्यक्ष पदासाठी एकूण तीन उमेदवारी अर्ज दाखलझाले होते. यात अपक्ष म्हणून घनश्याम शिरोडकर, भाजपच्या गटातून सदानंद नाईक तर भाजपा आणि दिगंबर कामत युतीचे उमेदवार म्हणून दामू शिरोडकर यांच्या अर्जाचा समावेश होता.

निवडणुकीपूर्वी कोठवाळे यांनी इच्छुक उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 15 मिनिटांचा अवधी दिला. या अवधीत सदानंद नाईक यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात घनश्याम शिरोडकर आणि दामू शिरोडकर दोघेच राहिले होते. सुशांत कुरतरकर यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना सर्वात प्रथम मतदान करण्याचा मान देण्यात आला. हे संपूर्ण मतदान मतपत्रिकेच्या आधारावर घेण्यात आले. संपूर्ण मतदान प्रक्रिया 45 मिनिटात आटोपली. त्यामुळे लगेच मतमोजणी घेण्यात आली. सुरुवातीपासूनच घनश्याम शिरोडकर मतमोजणीत आघाडीवर होते. 1 ते 15 पर्यंत कुठेही दामू शिरोडकर यांनी मतमोजणीत आघाडी घेतली नाही. शेवटी घनश्याम शिरोडकर यांना 15 तर दामू नाईक यांना 10 मते मिळून घनश्याम शिरोडकर विजयी ठरले. भाजपच्या गटातून पाच मते फुटल्याचा अंदाज आहे. निकाल जाहीर होताच गोवा फॉरवर्डचे सर्वेसर्वा आणि आमदार विजय सरदेसाई यांनी पालिकेत येऊन विजयी उमेदवार घनश्याम शिरोडकर यांचे अभिनंदन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT