गोवा

गोवा : तीन घटनांमध्ये ४६ लाख १५ हजारांना गंडा; नववर्षाच्या पूर्वसंध्येला फसवणूक

अनुराधा कोरवी

पणजी – पर्वरी वास्को: पुढारी वृत्तसेवा : नववर्षाच्या पूर्वसंध्येला आर्थिक गंडा घातल्याच्या तीन घटना घडल्या. तिन्ही घटनांमध्ये एकूण ४६ लाख १५ हजार रुपयांना गंडा घालण्यात आला. राजधानी पणजीत ग्राहकाच्या बँकेचे इमेल अकाऊंट बदलून ४२ लाख रुपये हस्तांतर केले. हा व्यवहार ऑनलाईन करण्यात आला. पर्वरी येथे सैन्य अधिकारी असल्याचे भासवून डॉक्टर महिलेला सुमारे तीन लाखांना लुटले. वास्कोत एटीएममध्ये कार्डाची अदलाबदल करून ज्येष्ठ नागरिकाच्या खात्यातून एक लाख पंधरा हजार रुपये काढले.

पणजीत बँकेच्या ग्राहकाला ४२ लाखांचा गंडा

पणजी : येथील एका खासगी बँकेचा ई-मेल आकाऊंट बदलून त्याद्वारे एका ग्राहकाला तब्बल ४२ लाख रुपयाला गंडा घालण्यात आला. या प्रकरणी पणजी पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पणजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळ उत्तर प्रदेश येथील एक व्यक्ती जो काही वर्षांपूर्वी गोव्यात कामाला होता, त्याने पोलिसांत तक्रार दिली. आरबीएल बँकेतील त्यांचे तब्बल ४२ लाख गायब झाले आहेत. याबाबत त्यांनी त्याचेच उत्तर प्रदेशमधील मित्र असलेले दोघे व्यक्ती व बँकेच्या अधिकाऱ्यावर फसवणुकीचा संशय व्यक्त केला आहे. पणजी पोलिसांच्या मते या प्रकरणात तांत्रिक चूक झालेली असू शकते.

पोलिसांनी तक्रार नोंद करून घेतली असून, पोलिस उपनिरीक्षक अल्लाउद्दीन खान या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

वास्कोत ज्येष्ठ नागरिकाचे एटीम कार्ड चोरले

वास्को: एटीएममध्ये आपले लक्ष दुसरीकडे वळवून आपल्या एटीएम कार्डाची अदलाबदल करून एका अज्ञात व्यक्तीने खात्यातून एक लाख पंधरा हजार रुपये काढल्याची तक्रार फ्रान्सिस्को जुआंव फर्नांडिस यांनी वास्को पोलिस ठाण्यात केली. याप्रकरणी वास्कोचे उपअधीक्षक सलिम शेखर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मयुर सावंत तपास करीत आहेत.

फर्नांडिस हे २० डिसेंबरला दुपारी सव्वाबाराच्या दरम्यान वास्कोतील भारतीय स्टेट बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी आले होते. यावेळी एटीएमध्ये असलेल्या एका अज्ञात व्यक्तीने त्यांचे लक्ष विचलित करून हातचलाखी करून त्याचे एटीएम कार्ड बदलले. त्यानंतर वेगवेगळ्या पाच ठिकाणी व्यवहार करून त्यांच्या खात्यातील रक्कम काढली. फसल्याचे लक्षात आल्यावर फर्नांडिस यांनी पोलिसांत धाव घेतली.

पर्वरीत सैन्य अधिकारी असल्याचे भासवून महिला डॉक्टरला गंडा

पर्वरी : भारतीय सैन्यातील जवानांची दंत चिकित्सा करायची आहे, असे सांगून बँक खात्याची माहिती घेणाऱ्या भामट्याने पर्वरीतील डॉ. गीता केरकर यांना सुमारे तीन लाखांचा गंडा घातला आहे. पोलिसानी अज्ञातीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, डॉ. केरकर यांना दि. १९ ऑगस्ट रोजी एक अज्ञात व्यक्तीने फोन केला आणि आपण लष्करी अधिकारी असल्याचे सांगितले. जवानांची दंत चिकित्सा करायची आहे. त्यासाठी त्यांना तुमच्याकडे घेऊन येतो, असे सांगून केरकर यांच्याकडून बँक खात्याची माहिती घेतली. त्यानंतर त्या तोतया अधिकाऱ्याने काही लिंक केरकर यांच्या मोबाईल फोनवर पाठविले. केरकर यांनी त्या लिंकवर क्लिक केले तेव्हा त्यांच्या बँक खात्यातून दोन लाख ८५ हजार वजा झाले.

याप्रकरणी त्यांनी पर्वरी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला. उपनिरीक्षक प्रतीक भट पुढील तपास करीत आहे.

SCROLL FOR NEXT