गोवा

गोवा : डिचोली तालुक्यात रंगतदार लढती अपेक्षित

दिनेश चोरगे

डिचोली;  पुढारी वृत्तसेवा :  डिचोली तालुक्यातील एकूण सतरा पंचायत विभागातील 125 प्रभागातून तीनशेहून अधिक उमेदवारानी अर्ज दाखल केले आहेत. सोमवारी शेवटचा दिवस असल्याने अजूनही अर्ज सादर होणार आहेत. मंगळवारी छाननी होणार आहे. बुधवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्यानंतर प्रभागवार चित्र स्पष्ट होणार आहे.

भारतीय जनता पक्षातर्फे पक्षीय पातळीवर पॅनेल नसले तरी आपल्या मर्जीतील उमेदवारांना विजयी करण्यासाठी फिल्डिंग लावली जात आहे. प्रभागात एकाहून अधिक पक्षाचे उमेदवार आमने सामने असल्याने कार्यकर्त्यांची नेत्यांची गोची झाली आहे. त्यामुळे कोणाला झुकते माप असेल, त्याकडेही लक्ष आहे.

साखळी मतदारसंघातील कुडणे, न्हावेली, पाळी, वेळगे, सुर्ला, आमोणा पंचायत क्षेत्रातील अनेकांना आरक्षणाचा फटका बसलेला आहे. काहींनी इतर प्रभागात नशीब अजमावण्याचा प्रयत्न करत अर्ज दाखल केले आहेत.
काही उमेदवारांना रिंगणात उतरता येऊ नये, याची खबरदारी पद्धतशीरपणे आखण्यात आल्याचे काही सदस्यांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे अनेक समर्थक रिंगणात उतरले असून झुकते माप कुणाला मिळणार ते पाहावे लागेल काँग्रेसतर्फेही अंतर्गत चाचणी सुरू आहे.

आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांचे अनेक समर्थक रिंगणात उतरले आहेत. भाजप नेते राजेश पाटणेकर यांनी आपल्या परीने फिल्डिंग लावण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. नरेश सावळही सक्रिय झाल्याची चर्चा आहे. मये मतदारसंघात प्रेमेंद्र शेट यांच्या पुढाकाराने एक दोन उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची शक्यता आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT