म्हापसा; पुढारी वृत्तसेवा : चीनने केलेली घुसखोरी थोपवून त्यांना आपल्या सैनिकांनी माघारी पाठवले. त्यामुळे जगाचे लक्ष भारताकडे आकर्षित झाले. एका बलाढ्य देशाची टक्कर देण्याचा सामर्थ्य भारताकडे आहे, याची जाणीव जगाला झाली. 2047 पर्यंतचा काळ हा अमृतकाळ सफल करीत विकसित भारताला बलशाली बनवत विश्वगुरू करण्याचा संकल्प आपण करूया, असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी केले.
येथील नववर्ष स्वागत समिती व माहिती आणि प्रसारण खाते यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भारत व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते. हनुमान नाट्यगृहात ही व्याख्यानमाला झाली. उद्घाटनाला माजी पोलिस अधीक्षक उमेश गावकर यांच्यासह उद्योजक विवेक केरकर, संजय वालावलकर, अमेय नाटेकर व दीपक गोवेकर उपस्थित होते.
यावेळी देवधर म्हणाले की, ज्यावेळी चीनने आपल्यावर पहिला हल्ला चढवला त्यावेळी आपल्याकडे प्रतिकारशक्ती नव्हती. म्हणूनच आमची जमीन त्यांनी हडप केली. आज शस्रसज्ज भारताने त्यांना माघारी पाठवले. चीनच्या सामर्थ्याला सुरूंग लावत त्यांना संपुष्टात आणण्याचे काम भारतच करेल. आपली शस्रास्रे खपावीत म्हणून अमेरिकेने दहशतवाद्यांना पाठिंबा दिला. त्याचे परिणाम जग भोगत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक अडचणींवर मात करीत देशाला संकटानातून बाहेर आणले. कोरोनासारख्या संकट काळात 920 कोटी प्रतिबंधक डोस तयार करण्यात आल्या. काही डोस गरीब देशांना मोफत देण्याचे औदार्य दाखवलं. कार्यक्रमाची सुरुवातीला तनिष्का मावजे हिने ईशस्तवन म्हटले. सूत्रसंचालन अमेर वरेरकर यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे हिंदू धर्मविरोधी नव्हते. त्यांनी बुद्ध धर्माचा स्वीकार करून या मातीचे महत्त्व वाढवले. प्रत्येक व्यक्ती सामाजिक दृष्ट्या सकारात्मक हवी. तृतीयपंथीयांना हिणवू नका. प्रत्येक व्यक्तीचं स्वत:चं कर्तव्य आहे. मी माझ्या देशासाठी काय योगदान देतो? याचा विचार प्रत्येकाने करावा. सामाजिक बांधिलकी महत्त्वाची आहे. आपला समाज बलवान झाला तर देश बलवान होईल, असे ते शेवटी म्हणाले.