पणजी; पुढारी वृत्तसेवा : गोवा पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिस पथकाने सोमवारी मध्यरात्री छापा टाकून शंभरपेक्षा जास्त धान्याची पोती तीन खासगी गोदामातून जप्त केली होती. याप्रकरणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नागरी पुरवठा खात्याच्या अधिकार्यांना क्लीनचिट दिली आहे.
गुरुवारी एका कार्यक्रमादरम्यान बोलताना डॉ. सावंत यांनी सांगितले की, जो गहू व तांदूळ पकडण्यात आला आहे तो नागरी पुरवठा खात्याच्या गोदामातून चोरी गेलेला नाही. काही स्वस्त धान्य दुकानदारांनी त्यांच्याकडे राहिलेला वा लोकांनी न घेतलेला गहू व तांदूळ परस्पर तिसर्या व्यक्तीला विकला असावा, असे मुख्यमंत्री म्हणाले. नागरी पुरवठा खात्याच्या अधिकार्यांचा यात थेट सहभाग नाही. परस्पर धान्य विकणारी स्वस्त धान्य दुकाने कोणती याचा शोेध घेऊन कारवाई केली जाईल. तसेच या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला पकडून कडक कारवाई करू, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
पसार असलेला व मुख्य सूत्रधार असल्याची शंका असलेला गोदाम मालक सचिन नाईक बोरकर याने धान्याचा काळाबाजार केल्याचा आरोप फेटाळला असून आपल्याला फसवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा केला आहे. दरम्यान, क्राईम ब्रान्चकडून नागरी पुरवठा खात्याच्या फोंडा येथील धान्य गोदामातील धान्याची तपासणी सुरू आहे. तसेच संबधित कर्मचार्यांचीही चौकशी सुरू आहे. गुरुवारी दुपारी क्राईम ब्रान्चकडून ही तपासणी सुरू करण्यात आली आहे.
या प्रकरणातील मुख्य सूत्रधार सचिन नाईक बोरकर आणि वीरेंद्र म्हार्दोळकर या दोघांनी पणजी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केले आहेत. पोलिसांनी अटक केलेल्या दोन्ही ट्रक चालकांना फोंडा येथील प्रथमवर्ग न्यायालयाने सशर्त अंतरिम जामीन मंजूर केला आहे.
फोंडा : राज्य सरकारच्या नागरी पुरवठा खात्यातील धान्याचा घोटाळा उघड झाल्यानंतर आता याप्रकरणी तपास करणार्या पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने गुरुवारी दुपारी बेतोडा येथील खात्याच्या गोदामाला आकस्मिक भेट देऊन तेथील स्थितीची पाहणी केली. या गोदामातील शिल्लक धान्याची तपासणी तसेच तेथील कर्मचार्यांकडे विचारणा केल्यानंतर हे तपास पथक कुठ्ठाळी येथील खात्याच्या गोदामाची पाहणी करण्यासाठी रवाना झाले. सध्या नागरी पुरवठा खात्याच्या सर्व गोदामांची झाडाझडती सुरू आहे. या धान्य घोटाळ्यात खात्याचे संचालक गोपाळ पार्सेकर यांनी हात झटकत पकडलेला धान्यसाठा हा खात्याचा नसल्याचा दावा केला आहे, मात्र याप्रकरणी खात्याच्या अधिकार्यांचा हात असल्याशिवाय अशाप्रकारचा काळाबाजार होणेच शक्य नाही, असा दावा पोलिसांनी केली आहे.
दरम्यान, या धान्य चोरीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिघाहीजणांना फोंडा प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकार्यांनी सशर्त जामीन मंजूर केला. कुर्टीतील धान्याचा काळाबाजार प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी प्रकाश करीशेट्टर तसेच तौसिफ मुल्ला व रामकुमार गणेश हजाम या तिघांनाही प्रत्येकी वीस हजार रुपयांच्या जामिनावर तपासकामाला योग्य सहकार्य करण्यासंबंधी ताकीद देऊन सोडण्यात आले.