पणजी; पुढारी वृत्तसेवा : गोव्यातील खाण व्यवसाय साडेचार वर्षांनंतर सुरू होण्याचे संकेत आहेत. गोवा सरकारच्या खाण खात्याने यापूर्वी केलेल्या घोषणेनुसार चार खाणींच्या ई-लिलाव निविदा जाहीर केल्या आहेत.
लिलावासाठी राज्यातील महत्त्वाच्या चार खाणी तथा चार ब्लॉक उपलब्ध केले आहेत. या चार खाणींवरील काम सुरू झाल्यास खाणबंदीमुळे बेरोजगार झालेल्या शेकडो खाण अवलंबितांना रोजगार प्राप्त होण्याची आशा आहे. सरकारने खाणींचा लिलाव करताना तेथील खाणीवर जे पूर्वी कामाला होते त्यांना प्राधान्य देण्याची अट खाण कंपन्यांना घातली आहे. खाण खात्याने जाहीर केलेल्या नोटिसीनुसार, चार खाणींसाठी 15 नोव्हेंबरपर्यंत अर्ज नेऊन ते 21 नोव्हेंबरपर्यंत सादर करायचे आहेत. सरकारने यापूर्वीच खाणी सुरू करण्यासाठी एमएसडीसीची नियुक्ती केलेली आहे.
राज्यातील खाणी अनेक वर्षांपासून बंद आहेत. 2018 साली काही प्रमाणात खाणी सुरू झाल्या. मात्र, त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने खाण काम बंद करण्याचे आदेश दिल्याने राज्यातील संपूर्ण खाण व्यवसाय बंद आहे. खाण व्यवसाय हा गोव्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देणारा असून राज्याच्या विकासात मोठा हातभार लावणारा हा व्यवसाय आहे. राज्यातील खाणी पुन्हा सुरू करण्यासाठीच्या प्रयत्नात खाणपट्ट्यांचा लिलाव करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
चार मोठ्या खाणपट्ट्या लिलावासाठी उपलब्ध केल्या आहेत. त्यांच्या लिलावानंतर राज्यातील खाण व्यवसाय सुरू होईल. त्यानंतर इतर खाणींचे लिलाव टप्प्याटप्प्याने केले जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे. खाण संचालक सुरेश शानबाग यांनी खाण लिजांचा ई-लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू केली असून त्यासाठी निविदा मागवल्या आहेत. ही प्रक्रिया सुरू झाली आहे. ज्या चार खाणींचा लिलाव पुकारण्यात आला आहे, त्या विस्तीर्ण क्षेत्र व्यापतात, असे शानबाग यांनी सांगितले.
सरकारवर विश्वास नाही. खाणी प्रत्यक्ष सुरू झाल्यानंतरच या निर्णयाचे मी स्वागत करेन. खाणी सुरू होण्याबाबत कोणतीच स्पष्टता नाही. आताच आनंद साजरा करता येणार नाही.
– पुती गावकर, नेते, मायनिंग पिपल फ्रंट