पणजी ः पुढारी वृत्तसेवा राज्य सरकारच्या अन्न व औषध प्रशासन संचालनालयाच्या (एफडीए) तपास पथकाने छापा मारून खराब काजूगर जप्त केले. याप्रकरणी दोघा विक्रेत्यांना प्रत्येकी 10 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.
एफडीएच्या अधिकार्यांने दिलेल्या माहितीनुसार जिल्हाधिकारी, उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा यांनी अन्न सुरक्षा आणि मानक कायद्यांतर्गत न्यायनिवाडा अधिकारी म्हणून प्रत्येकी एक प्रकरण निकाली काढले आहे. ज्यात उत्पादक आणि विक्रेता यांना दोषी ठरवण्यात आले आहे. खराब काजूगर विक्रीसाठी हा दंड ठोठावला आहे.
उत्तर गोव्यात कळंगुट येथील दुकानात तपास अधिकारी अतुल देसाई यांनी छापा टाकून खराब झालेले, डाग पडलेले काजूगर जप्त केले होते तर मडगाव येथील एका सुपरमार्केटमधून अन्न सुरक्षा अधिकारी झेनिया रोझारियो यांनी खराब काजूगर जप्त केले होते. या दोन्ही विक्रेत्यांना खराब काजूगर विकण्याच्या आरोपाखाली प्रत्येकी 10 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला व ताकीद देण्यात आली असून निकृष्ट दर्जाच्या काजू व इतर वस्तू विक्री विरुद्ध मोहीम सुरूच राहणार असल्याची माहिती एफडीएच्या अधिकार्याने दिली.