केपे : पुढारी वृत्तसेवा बुधवारी सकाळी मुलांना घेऊन जाणार्या बालरथ आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली. यामध्ये दुचाकीस्वार जेसवर्ड जुएल मार्टीन हा अठरा वर्षांचा विद्यार्थी जागीच ठार झाला. हा भीषण अपघात आवेडे येथील मुख्य रस्त्यावर झाला.
केपे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेसवर्ड हा चांदोर येथील रहिवासी आहे. बुधवारी सकाळी तो अॅक्टिव्हा दुचाकी (जी ए 08 डब्ल्यू 6341) घेऊन शेल्डे येथे नेहमीप्रमाणे व्यायामशाळेत जात होता. यावेळी आवडे पारोडा येथील इमेक्युलेट कंसेप्शन हायस्कूलचा बालरथ (जीए 07 एस 0087 )विरुद्ध दिशेने येत होता. पारोडा येथे दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली.
या अपघातात जेसवर्ड याची दुचाकी थेट बालरथच्या दर्शनी भागाखाली गेली. ही धडक एवढी भीषण होती की जेसवर्ड बसच्या धडकेत बाहेर फेकला गेला. त्याच्या डोक्याला मार लागल्याने रक्तस्त्राव झाला. इस्पितळात नेले असता त्याला मृत म्हणून घोषित करण्यात
आले. केपे पोलिस तपास करीत आहेत.