गोवा

गोवा : कळसा प्रकल्पासाठी कर्नाटकचा नवा डाव

दिनेश चोरगे

डिचोली;  पुढारी वृत्तसेवा :  कर्नाटक सरकारने गोवा कर्नाटक सीमेवरील कळसा नाल्याचे पाणी मोठ्या वाहिनींच्या सहाय्याने बेळगाव, हुबळी, गदग, बागलकोट या भागांमध्ये पिण्याच्या वापरासाठी नेण्यासाठी कणकुंबी परिसरात काम सुरू केेले आहे. कळसा, भांडुरा व हलथरा या नाल्यांवर धरण बांधून ते पाणी नेण्याच्या प्रस्तावाला गोव्याच्या विरोधामुळे सध्या स्थगिती देऊन या नव्या प्रकल्पाच्या माध्यमातून पाणी पळवण्याचे काम कर्नाटकने सुरू केेले आहे. कर्नाटकच्या या प्रस्तावाला केंद्रीय जल लवादाने मान्यता दिली आहे. त्याच मान्यतेचा गैरफायदा घेऊन कर्नाटक हा नवा डाव आखत आहे.

पर्यावरण प्रेमी प्रा. राजेंद्र केरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कळसा नदीवर धरण बांधून ते पाणी मलप्रभेच्या माध्यमातून पळवण्याचा जुना आराखडा तूर्त 'जैसे थे' ठेवत त्याऐवजी बंधारे उभारून त्यातून पाणी वळवून ते बेळगाव, धारवाड, गदग व बागलकोट जिल्ह्यांतील गावांसाठी वापरण्यासाठी नवी योजना कर्नाटकने आखली आहे.

कर्नाटकने आंबेखोल ते कणकुंबी या ठिकाणच्या कळसा कामाच्या क्षेत्रात खांब घालण्याचे काम सुरू केले आहे. हल्लीच काँग्रेसचे राज्यसभा सदस्य जी. सी. चंद्रशेखर यांनी केंद्र सरकारला कळसा भांडुरा प्रकल्प राष्ट्रीय प्रकल्प घोषित करून कर्नाटकला कळसा नाल्याचे पाणी वापरण्याची परवानगी देण्याची मागणी केली होती.

सध्या कणकुंबी येथील जे पाणी पूर्वी गोव्याच्या दिशेने प्रवाहित होत होते ते वळवून कृत्रिमरीत्या वाटा तयार करून मलप्रभेच्या दिशेने वळवण्यात आल्याने कळसा नाल्याच्या प्रवाहावर विपरीत परिणाम झाला आहे. कळसा हलथतरा, भांडुरा येथे 12 मीटरचे बंधारे उभारण्याची योजना आहे. तसेच परिसरातील पाणी खुल्या पद्धतीने न वळवता मोठ्या जलवाहिन्या टाकून नेण्याचा प्रयत्न सुरू केला
आहे.

भेट देऊन केली पाहणी
गोव्याच्या विरोधाला न जुमानता सातत्याने प्रकल्पाचे काम तडीस नेण्याचे प्रयत्न कर्नाटकने चालवलेले आहेत. प्रा. राजेंद्र केरकर यांनी गुरूवारी कणकुंबीला भेट दिली असता हा प्रकार निदर्शनास आल्याची माहिती त्यांनी दिली.

SCROLL FOR NEXT