गोवा

गोवा : औद्योगिकीकरण-पर्यावरण समतोल हे दिवास्वप्न

मोनिका क्षीरसागर

पणजी : भारत शिंदे
मानवाला जगण्यासाठी काय पाहिजे. आपण उद्योगांशिवाय जगू शकत नाही काय, तर यापूर्वी आपण उद्योगांशिवाय जगू शकत होतो आणि जगू शकतो. दोन लाख वर्षांपर्यंत माणूस जगलेला आहे. दोनशे वर्षांमध्ये आपल्या गरजा वाढल्या. देशातील 90 शहरे प्रदूषित झालेली आहेत. माणसाला जगायचे असेल, तर पर्यावरण संतुलनाच्या वेगवेगळ्या परिमाणांबरोबर तडजोड करून चालणार नाही. गेल्या दोनशे वर्षांचा अनुभव लक्षात घेता औद्योगिक विकासाबरोबर पर्यावरण संवर्धन समतोल राखणे म्हणजे दिवास्वप्न आहे, असे स्पष्ट मत पर्यावरण तज्ज्ञ कुमार कलानंद मणी यांनी जागतिक हवामान दिनानिमित्त दैनिक 'पुढारी'शी बोलताना व्यक्‍त केले.

वाढत्या तापमानाचा गोव्यावर काय परिणाम होईल असे विचारले असता कुमार मणी म्हणाले की, हवामान आणि वायू मंडलाला प्रांताची मर्यादा नसते. त्याला वैश्‍विक दृष्टिकोनातून पाहायला हवे. जागतिक तापमान वाढ लक्षात घेता फक्त गोव्यापुरता विचार करून चालणार नाही. आपण गोव्या मुक्तीचा सुवर्णमहोत्सव साजरा करीत आहोत. गोव्याचा भूगोल बदललेला नाही; पण या भूभागावरील लोकवस्तीत प्रचंड वाढ झाली आहे. 2011 च्या सर्व्हेनुसार लोकवस्ती पाच-सहा पट वाढली आहे. नैसिर्गिक संपत्तीचा विनाश होत आहे. पत्रादेवीपासून पोळेपर्यंतचे शहरीकरण पाहिले की लक्षात येईल. जंगल आणि कृषी क्षेत्र कमी होत आहे. गोव्यातील हवा शुद्ध राहिली नाही. याबाबत आपण विचार करत नाही. मागील वीस वर्षांचा विचार केला तर हवामान कॅलेंडर बदललेले आहे. मेमधील उष्णता मार्चमध्ये जाणवत आहे, असे त्यांनी नमूद केले.

आपण स्वतः शिक्षित समाज म्हणतो; पण बदलणार्‍या हवामानाबरोबरच आपणही बदलले पाहिजे, याचा विचार आपल्याला बदलत्या ऋतुचक्रावरून पडत नाही, असे स्पष्ट करून मणी म्हणाले की, माणसाकडून निसर्गाचे शोषण वाढत आहे. यापूर्वी पर्यावरण संवर्धनाचा काळ मोठा होता. उपभोगाचे प्रमाण मात्र कमालीचे वाढले आहे. त्यामुळे पाणीटंचाई, हवामानातील बदल जाणवत आहे. गोव्यामध्ये पूर्वी बहुतांश भाग विहिरीवर, तलावावर अवलंबून होता. आता नळाद्वारे पाणी घरोघरी येत आहे. त्यामुळे त्याचा वापर वाढला आहे. यामुळे जगण्याची शाश्‍वत पद्धत बंद झाली आहे. त्यातून जलसंवर्धनाची प्रक्रिया बंद पडली. खप वाढला, परिणामी समस्याही वाढल्या. निसर्ग संवर्धनची संस्कृती लोप पावल्याचा परिणाम ऋतुचक्रावर दिसून येतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

मणी म्हणाले की, हा जागतिक प्रश्न आहे. मी 2009 साली कोपेनहेगन डेन्मार्कमध्ये क्लायमॅट कॉन्फरन्सला उपस्थित होतो. त्यामध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये असलेल्या अत्यंत छोट्या तवालू द्वीपचा प्रतिनिधी होता. त्यांनी दहा-बारा दिवस परिषद गाजवली होती. सर्व लहान द्वीप बुडत आहेत. त्यामध्ये मालदिव, श्रीलंका यांचा उल्लेख केला होता. तसेच भारतामध्ये गोव्याचाही उल्लेख होता. समुद्राची पातळी वाढत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त जागा समुद्रामध्ये जात आहे, असे भाकीत त्यांनी केले.

आधुनिकतेचा प्रवास…

युरोपमध्ये औद्योगिकरणाचे वारे वाहू लागले. आणि माणसाच्या जीवनामध्ये फरक पडत गेला. या काळात माणसाचे जीवन बदलून गेले. जीवन जगणे फार सोपे झाले आहे, असे मत झाले आहे. सर्व क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल झाला आहे. त्यातून परिवर्तन आले. दुसरी बाजू अशी की, हा काळ सुरू झाला तेव्हा पृथ्वीतलावरील लोकवस्ती 100 कोटी होती. आता 800 कोटी लोकसंख्या झाली आहे. ही वाढ दोनशे वर्षांतील आठपट वाढ आहे. पृथ्वीतलावर अन्यही जीवसृष्टी आहे. त्यापैकी माणूस हा पृथ्वीचे सर्वात जास्त शोषण करणारा प्राणी आहे. या काळात जगभर वाहनांची संख्या वाढली. त्यातून प्रदूषण आले. याचा पहिला आघात झाला तो जंगलावर. या काळात साधारण 80 टक्के जंगल नष्ट झाले आहे. या काळात साधारण छोटी-मोठी 26 हजार युद्धे झाली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT