गोवा

गोवा : आमदार दिगंबर कामत यांना जबरदस्त धक्का; मडगावात गेम चेंजर ठरला ‘विजय’

मोहन कारंडे

मडगाव; विशाल नाईक : पितृपक्ष सुरू असताना काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केलेले आमदार दिगंबर कामत यांना त्यांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत मडगावात पहिल्यांदाच धक्का बसला. मुख्यमंत्र्यांच्या मदतीने दामोदर शिरोडकर यांना नगराध्यक्ष बनविण्याचा कामत यांचा डाव फसला. गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी गेम चेंजर बनत अपक्ष उमेदवार घनश्याम शिरोडकर यांना पंधरा विरुद्ध दहाच्या मतांनी निवडून आणले. भाजपवासीय झालेले कामत हे नगरसेवक दामोदर शिरोडकर यांना नगराध्यक्ष बनवण्यासाठी प्रयत्नशील होते. त्यासाठी त्यांनी गुरुवारी रात्री मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनाच मडगावात पाचारण केले. भाजपचे 9 नगरसेवक घेऊन 16 नगरसेवकांच्या बळावर पालिकेवर सत्ता स्थापन करू पाहणार्‍या कामत यांना फातोर्डाचे आमदार आणि गोवा फॉरवर्डचे सर्वेसर्वा विजय सरदेसाई यांनी जोरदार धोपीपछाड दिली.

मंगळवारी दिगंबर कामत यांनी आपल्या 7 आमदारांसोबत भाजपात प्रवेश केला होता. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे मडगावात राजकीय उलथापालथी होणार असा अंदाज बांधला जात होता. मात्र, त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे भाजपचे मूळ कार्यकर्ते दुखावले होते. मात्र, उघडपणे बोलण्यासाठी कोणी पुढे येत नव्हते. कार्यकर्त्यांमधील घुसमट थांबवण्यासाठी खुद्द मुख्यमंत्र्यांना मडगावात यावे लागले होते. कामत यांचा उमेदवार पाडून या नगरसेवकांनी कामत यांच्या भाजप प्रवेशावर अप्रत्यक्षरीत्या आपला निषेध नोंदवला आहे. पराभवाचा हा धक्का कामत यांच्या जिव्हारी लागला असून त्यांच्या राजकीय कारकिर्दीसाठी हे संकट मानले जात आहे.

दिगंबर कामत यांच्या गटातून मडगाव नगराध्यक्षपदासाठी दामोदर नाईक यांना उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले होते. आपला गट नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवणार नाही, असे सरदेसाई यांनी जाहीर केल्यामुळे शिरोडकर यांचा मार्ग मोकळा होता. तरीही अपक्ष उमेदवार घनश्याम शिरोडकर यांनी आपला अर्ज नगराध्यक्ष पदासाठी दाखल केला होता. भाजपाचे नगरसेवक सदानंद नाईक आपली उमेदवारी मागे घेतील हे पूर्वीच ठरलेले होते. विजय सरदेसाई नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी उत्सुक नाहीत, हे स्पष्ट झाले होते. मात्र, कामत यांच्या भाजप प्रवेशामुळे सरदेसाई नाराज होते. अशा परिस्थिती त्यांच्या आठ नगरसेवकांचा पाठींबा मिळणार नाही हे कामत यांना माहित होते. त्यामुळे कामत यांनी मुख्यमंत्र्यांच्या सहाय्याने भाजपाच्या नऊ नगरसेवकांचा पाठींबा घेण्याचा प्रयत्न केला.

नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत गुरुवारी सायंकाळी मडगावच्या मोती डोंगरावर आले होते. यावेळी भाजपच्या पार्वती पराडकर वगळता कामिल बार्रेटो, सदानंद नाईक, रोनिता आजगावकर, महेश आमोणकर, श्वेता लोटलीकर, नगरसेविका सुशांता कुरतरकर यांचे बंधू आणि माजी नगरसेवक केतन कुरतरकर, मिलाग्रीना गोम्स आदी भाजपाचे नगरसेवक उपस्थित होते. यावेळी दिगंबर कामत गटाचे उमेदवार दामोदर शिरोडकर, सगुण नायक, लता पेडणेकर, सेंड्रा फर्नांडिस, दामोदर वरक, दीपाली सावळ आदी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी दोन्ही गटांचे मनोमिलनही केले. रात्री अकरा वाजेपर्यंत दोन्ही गट मोती वरील त्या हॉटेलवर उपस्थित होते. या सर्वांनी एकत्रित भोजन केले, छायाचित्रेही काढली. शिरोडकर किमान पंधरा नगरसेवकांच्या पाठिंब्यावर निवडून आल्यात जमा होते, असे चित्र निर्माण झाले असताना विजय सरदेसाई यांनी एका रात्रीत गेम चेंज केला. शुक्रवारी सकाळी सुमारे साडेअकराच्या सुमारास मतदानाला सुरुवात झाली. मतदानापूर्वी दामोदर शिरोडकर यांनी सर्व समर्थक नगरसेवकांबरोबर चर्चाही केली होती. आपला विजय निश्चित असल्याचे लक्षात आल्याने ते निर्धास्त होते. मात्र, मतमोजणीवेळी दामोदर यांच्या पदरात केवळ दहाच मते पडली होती. कोणाचाही पाठिंबा नसलेले घनश्याम शिरोडकर 15 मते घेत विजय झाले.

कामत यांचा भाजप प्रवेश अन् विजयी राजकारण

विजय सरदेसाई खरे गेम चेंजर ठरले. युतीचा शब्द पाळताना त्यांनी नगराध्यक्षपदासाठी आपला उमेदवार उभा केला नाही. मात्र, भाजप आणि कामत यांना शह देण्यासाठी भाजपचेच नगरसेवक एका रात्रीत फोडून कामत यांच्या राजकीय गडाला खिंडार पाडले आहे. घनश्याम यांनी उमेदवारी दाखल केल्यानंतर सरदेसाई यांच्याकडे मदत मागितली होती. युतीचा धर्म पाळताना सरदेसाई यांनी तुम्हाला एका मताचाही पाठींबा देऊ शकणार नाही असे सांगितले होते. मात्र, दिगंबर कामत यांनी भाजपात प्रवेश करताच सरदेसाई यांनी घनश्याम यांना पाठिंबा देण्याचे ठरविले आणि रात्रीच कामालाही लागले होते.

SCROLL FOR NEXT