गोवा

गोवा : 13 वर्षांत 5 बळी घेणारा ‘सनबर्न’ : धोरण बदलून परवानगी का? गोमंतकीयांचा सवाल

मोहन कारंडे

पणजी : दीपक जाधव : राज्यात अमली पदार्थांचा सर्रास वापर होत असल्याचा आरोप अनेकदा होतो. काही कोटींचे अमलीपदार्थ पकडण्याची कारवाईदेखील करण्यात येते. तरीही अमली पदार्थांचा वाढता विळखा कमी होताना दिसत नाही. त्यातच सनबर्न महोत्सवादरम्यानही ड्रग्जच्या सेवनामुळे आतापर्यंत पाचजणांचा मृत्यू झाला आहे. 13 वर्षांत 2 तरुणी आणि दोन तरुणांचा बळी घेणार्‍या सनबर्नसारख्या जीवघेण्या प्रकारांना सरकारने धोरणात्मक निर्णय बदलून परवानगी का दिली, असा प्रश्न गोमंतकीय विचारत आहेत.

राज्यातील रेव्ह पार्ट्या आणि सनबर्न महोत्सवाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ्यांचा वापर केला जातो, हे उघड सत्य आहे. किनारी भागात सर्रापणे अमलीपदार्थ्यांची विक्री आणि खरेदी होत आहे. हरियाणातील भाजप नेत्या तथा टिकटॉक स्टार सोनाली फोगाट यांना हणजूणे येथील कर्लिस बारमध्ये सात वेळा जबरदस्तीने ड्रग्ज पाजून त्यांचा खून करण्यात आला. त्यानंतर राज्यातील ड्रग्ज व्यवसाय पुन्हा चर्चेत आला. राज्यात ड्रग्जच्या अतिरेकी सेवनामुळे अनेक बळी गेले आहेत. 2009 मध्ये कांदोळी किनार्‍यावर झालेल्या सनबर्न गोवा महोत्सवामध्ये बंगळुरू येथील 23 वर्षीय नेहा बहुगुणा हिचा मृत्यू झाला होता. महोत्सवाच्या ठिकाणाहून नेहा हिला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर तिचा मृत्यू झाला. तिच्या शवविच्छेदन अहवालात अमलीपदार्थांच्या अतिसेवनामुळे मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी नमूद केले आहे. त्यामुळे या महोत्सवाच्या आयोजकांनी जरी तिथे अमलीपदार्थांचा वापर न झाल्याचा दावा केला केला असला तरी वैद्यकीय अहवालाने या महोत्सवातील अमली पदार्थांचा शिरकाव अधोरेखीत
केला होता.

2014 मध्ये कांदोळी येथे झालेल्या सनबर्न महोत्सवादरम्यान मुंबईतील फॅशन डिझायनर 27 वर्षीय ईशा मंत्रीचा मृत्यू झाला होता. ईशा ही या महोत्सवात नाचत असताना खाली कोसळली. त्याचवेळी तिची शुद्ध हरपली. मात्र, पोलिसांनी ती महोत्सवाच्या ठिकाणी नव्हे तर बाहेर पडली असल्याचा खुलासा केला होता. तिला तातडीने इस्पितळात दाखल करण्यात आले होते. मात्र, तिचाही मृत्यू झाला होता. ईशाची बहीण दुबईहून गोव्यात आल्यानंतर गोमेकॉत शवविच्छेदन करण्यात आले. तिच्या शवविच्छेदन अहवालानही अमलीपदार्थाचे सेवन केल्याचे कारण समोर आले होते.

2019 मध्ये वागातोर किनार्‍यावर सनबर्नचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तर तीन दिवसांच्या महोत्सवात तीन युवकांचा बळी गेला होता. या महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी आंध्रप्रदेशमधून आलेले साई प्रसाद (32 वर्ष), वेंकट सत्यनारायण (31 वर्ष) हे महोत्सवात नाचताना खाली कोसळले होते. त्यांना म्हापसा येथील इस्पितळात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर शेवटच्या दिवशी बेंगळुरू येथून महोत्सवात आलेला 24 वर्षीय संदिप कोट्टा हादेखील नाचताना खाली कोसळला होता. त्याला रुग्णालयात नेताना रुग्णवाहिकेतच मृत्यू झाला होता. या तिघांच्या मृत्यूमुळे सनबर्नवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. मात्र, सुरुवातीला हे तिनही मृत्यू हृदयविकाराचे असल्याचे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न आयोजकांनी केला होता. या तिघांचाही अमलीपदार्थाच्या अतिसेवनाने झाल्याचे नंतर उघड झाले होते.

वादात असणारे सनबर्न…

सनबर्नच्या आयोजकांनी 2012 मध्ये थेट राज्य सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सनबर्नच्या आयोजनांका थेट आव्हान दिले होते. आरोप सिद्ध करा, अन्यथा माफी मागावी असा इशारा दिला होता.

महाराष्ट्रातल्या विरोधानंतर गोव्यात स्थिरावला सनबर्न

सनबर्नच्या आयोजकांनी 2016 मध्ये सनबर्न महाराष्ट्रातील पुणे येथे आयोजित केला होता. या महोत्सवाला स्थानिकांनी कडाडून विरोध केला होता. त्यामुळे आयोजकांनी 3 वर्षांत दोनदा उत्सवाची ठिकाणे बदलली होती. त्यानंतर सनबर्न गोव्यात स्थिरावला आहे.
चौकट

सनबर्नमुळे स्थानिक वेठीस

गेली अनेक वर्ष सनबर्न आयोजित केला जातो. या महोत्सवाच्या आयोजनाने येथील लोकांना मात्र वेठीस धरले जाते. स्थानिक जनतेला वाहतुकीच्या कोंडीला सामोरे जावे लागते. या महोत्सवाच्या आयोजक करोडो रुपये कमावतात. मात्र, त्याचा गावासाठी काहीच उपयोग होत नाहीत. सरकार केवळ कराच्या माध्यमातून मिळणार्‍या पैशांवर खूष असते. जगात पुन्हा करोनाचा उद्रेक होत आहे. अशा परिस्थितीत गावात सनबर्न महोत्सवाच्या आयोजन सरकारकडून कोकेले जातंय? अशा महोत्सवांवर कायमस्वरुपी बंदी हवी.
– शीतल दाभोळकर, माजी पंच सदस्य, हणजूण-कायसूव

मूठभर लोकांचा फायदा…

सनबर्न सारखा मोठा महोत्सव वागातोर येथे आयोजित केला जातो. या महोत्सवाच्या माध्यमातून सरकार, हणजूण कोमुनिदाद, पंचायत यांच्या व्यतिरिक्त व येथील हॉटेल्स, टॅक्सी व काही मूठभर लोकांना फायदा होतो. या महोत्सव काळात स्थानिकांना धूर, धूळ व ध्वनी प्रदूषणाच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. सोबतच कचरा आणि वाहतूक कोंडीची समस्या वाढते. सनबर्न महोत्सवाचा स्थानिकांना कोणताही फायदा होत नाही, उलट त्रासच सहन करावा लागतो.
-रिमा नाईक, स्थानिक, हणजूण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT