मडगाव : पुढारी वृत्तसेवा : कोकण रेल्वेने 1 जानेवारी ते ऑगस्ट 2022 पर्यंत विविध एकूण 71 प्रकरणे नोंद करून घेतली आहेत. यामध्ये बेकायदेशीर चेन ओढणे व अन्य प्रकरणांचा समावेश आहे. यापैकी आतापर्यंत 45 जणांवर गुन्हा नोंद करून प्रथम वर्ग न्यायालयाद्वारे त्यांच्याकडून एकूण 23 हजार 850 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
रेल्वेत विनाकारण चेन ओढली तर एक हजार रुपये दंड आहे. दोषी व्यक्तीकडून हा दंड वसूल करून घेतला जातो. गेल्या आठ महिन्यांत 47 जणांना दंड देण्यात आला आहे. प्रथमवर्ग न्यायालयाने त्यांना हा दंड दिला आहे. आपत्कालीन वेळी एखादा रेल्वेतून बाहेर फेकला जात असल्यास रेल्वेची चेन ओढता येते.
रेल्वे प्रवास सुरू असताना रेल्वेची चेन ओढल्यास गुन्हा नोंद होऊ शकतो. संबंधितावर कायदेशीर कारवाई होते यावेळी त्याच्याकडून दंडाची रक्कम वसूल करण्यात येते. कायद्याचे पालन सर्वांनीच केले पाहिजे, असे बबन घाटगे या कोकण रेल्वेच्या वरिष्ठ जनसंपर्क अधिकारीने सांगितले आहे.