मडगाव ; विशाल नाईक : ज्या रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून कुख्यात गुंड टायगर अन्वर गेली अनेक वर्षे गोव्याबरोबरच कर्नाटकात दहशत माजवत होता, ते रिव्हॉल्व्हर बनावट स्वरूपाचे होते.
ज्यावेळी इम्रान चौधरी आणि इतर साथीदार त्याच्यावर कोयता, कुर्हाडीने सपासप वार करत होते, त्यावेळी अन्वरने त्यांच्यावर रिव्हॉल्व्हर रोखले होते, पण तो चाप ओढत नव्हता, अशी धक्कादायक माहिती सावनूर पोलिसांच्या तपासात समोर आली आहे.
एका आरोपीने आपल्या घरात ते डमी रिव्हॉल्व्हर लपवून ठेवले असून, लवकरच ते जप्त केले जाणार आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक हनुमंतराया यांनी दै. 'पुढारी'ला दिली.
प्राप्त माहितीनुसार, सावनूर पोलिसांनी आतापर्यंत इम्रान चौधरीसह आणखी तिघांना ताब्यात घेतले आहे.आरोपींकडून एक कुर्हाड,दोन सुरे,तसेच अन्वर वापरत असलेली स्विफ्ट कार जप्त केली आहे.पोलिस अधीक्षक हनुमंतराया यांच्यांशी चर्चा केली असता सदर पिस्तुल बनावट स्वरूपाचे आहे ,अशी माहिती त्यांनी दिली.
अधीक्षक हनुमंतराया यांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्वर वरचेवर सावनूर येथे येत होता.अनेकांकडून त्याने पैसे उकळले होते.त्या आरोपींचीही त्याने पैशांंसाठी सतावणूक चालवली होती.दर वेळी त्यांना धमकावून तो त्यांच्याकडून पैसे उकळत होता.आणि पोलीस तक्रात नोंद झाल्यानंतर पुन्हा गोव्यात पळून जात होता.
खंडणीच्या प्रकरणामुळे त्यांच्यात बर्याच वर्षापासून वाद सुरू होता आणि त्यातुनच इम्रान चौधरी आणि त्याच्या साथीदारांनी संधी मिळताच त्याचा काटा काढला असे आतापर्यंतच्या तपासात समोर आले आहे.अन्वर रात्रीच्या वेळी सावनूर येथे यायचा.त्यांना एकांतात पकडून तासभर मारहाण करायचा आणि पैसे मिळाल्यानंतर पळून जायचा. पोलीस बर्याच महिन्यांपासून त्याच्या मागावर होते.
एकदा तो कोठडीतुन पळून गेला होता तर एकदा त्याच्या घरावर धाड टाकली असता पोलिसांच्या हातावर तुरी देऊन तो पळून गेला अशी माहीती त्यांनी दिली.