पणजी : केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या आंदोलनावेळी ‘फ्री उमर खलिद’ असा असा मजकूर असलेला फलक प्रदर्शित करून गोव्याच्या भूमीवर राष्ट्रविरोधी घटकांचे उघडपणे उदात्तीकरण केल्याने त्याचा रविवारी (दि. २६) आझाद मैदानावर युवाशक्तीने निषेध केला. उमर खलिद यासारख्या राष्ट्रविरोधी विचारसरणीच्या समर्थनार्थ फलक झळकावणे हा आपल्या भारतमातेचा, तसेच आपल्या शूर हुतात्म्यांचा थेट अपमान आहे, अशा शब्दांत निषेध करण्यात आला. अशा विचारसरणींच्या लोकांविरोधात आवाज उठवण्याची वेळ आली आहे, असे मत यावेळी काही वक्त्यांनी व्यक्त केले.
हे आंदोलन नीट पेपरफुटीप्रकरणी संबंधित मंत्र्यांचा राजीनाम्यासाठी होते, तर हा उमर खलिद फलक प्रदर्शित केला गेला तो युवाशक्तीचा अपमान आहे. नीट पेपरफुटीपुरतेच हे आंदोलन असताना ते हायजॅक करण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणाशी त्याचा काहीही संबंध नसताना विद्यार्थ्यांचा वापर करून हा प्रदर्शित केलेला फलक राष्ट्रहितविरोधी असल्याची मते व्यक्त करण्यात आली. या आंदोलनावेळी उमर खलिद याला मुक्त करण्याचा फलक हातात घेण्यामागे राजकीय हेतू कोणाला तरी साध्य करण्याचा त्यामागील भाग होता. त्याने आपला चेहरा लपविला होता. म्हापसा येथेही असाच प्रकार घडला होता. मात्र पणजीत हा प्रकार जेव्हा उघडकीस आला तेव्हा पणजी पोलिसांनी त्वरित त्याविरुद्ध कारवाई केली. ज्या युवकाच्या हातात हा फलक होता त्याने आपली ओळख उघड केली नव्हती. तो एका एनजीओसाठी काम करत असल्याचे उघडकीस आले आहे. तो दिल्लीतून गोव्यात कोणत्या कारणास्तव आला याचीही चौकशी व्हायला हवी, अशी मागणी या जमलेल्या युवाशक्तीने केली.