फोंडा : पेटके-धारबांदोडा येथे दुचाकी व ट्रक यांच्यात धडक होऊन दुचाकीवरील एक जण ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला. दिल्ली येथील तांत्रिक महाविद्यालयाचे ते विद्यार्थी आहेत. दरम्यान, शुक्रवारी सुकतळी ते आमोणामार्गे खनिज वाहतूक सुरू झाली होती त्यात खनिज वाहतुकीचा हा पहिला बळी ठरला आहे.
राहुल बन्सल (वय 19) असे असून जखमीचे नाव शौनक प्रभाकर (वय 19) असे आहे. दोघेही हरयाणा राज्यातील असून गोव्यात पर्यटनासाठी आलेल्या सातजणांच्या गटातील हे दोघेजण होते. बागा येथून तीन दुचाक्या घेऊन सहाजण दूधसागरच्या दिशेने भरधाव जाताना एका दुचाकीला हा अपघात झाला. मोलेहून आमोण्याला निघालेल्या जीए 05 पी 2519 क्रमांकाच्या ट्रकशी जीए 03 एजे 4840 या क्रमांकाच्या दुचाकीची जोरदार धडक बसल्याने त्यात राहुल बन्सल याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला इस्पितळात नेत असताना त्याचे वाटेतच निधन झाले तर दुसरा दुचाकीस्वार शौनक प्रभाकर हा गंभीर जखमी झाल्याने त्याला बांबोळी इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. फोंडा पोलिसांनी पंचनामा करून मयत व जखमीच्या कुटुंबियांना अपघाताची माहिती दिली आहे.
स्कुटरची ट्रकला जबरदस्त धडक बसल्याने त्यात स्कुटरचे दोन तुकडे झाले. अपघातात दुचाकीस्वार उसळून रस्त्यावर आदळल्याने तो गंभीर जखमी झाला त्यातच राहुलचे निधन झाले.