एथन परेरा Pudhari File Photo
गोवा

कॅलिफोर्नियातील गोळीबारात सासष्टीतील युवकाचा मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

सॅक्रामेंटो / मडगाव : ड्रॅग रेसच्या नादात कित्येक गोमंतकीय युवकांनी आपला जीव गमावला आहे. ड्रॅग रेसच्या या मोहाने कॅलिफोर्नियातही गोमंतकीय युवकांची पाठ सोडलेली नाही. कॅलिफोर्निया येथील घराजवळ सुरू असलेली जीवघेणी ड्रॅग रेस शर्यतीच्या मोहात सासष्टी तालुक्याच्या धर्मापूर येथील 20 वर्षीय एथन परेरा या युवकाने आपला जीव गमावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ड्रेसमधील डोनटस् या प्रकारात ताबा सुटलेल्या गाडीने लोकांना उडवल्याच्या घटनेनंतर झालेल्या गोळीबारात एथन परेरा जागीच ठार झाला.

ही घटना 27 जानेवारी रोजी घडली होती. 31 जानेवारी रोजी ओकलंड पोलिसांनी त्याच्या मृत्यूची खात्री करून गोव्यातील त्याच्या कुटुंबीयांना त्याच्या मृत्यूविषयी कळवले होते. त्याच्या दंडावरील टॅटूमुळे त्याची ओळख पटल्याची माहिती पोलिसांनी कुटुंबाला दिली आहे. एथन दहा वर्षांपूर्वी आई-वडिलांसह कॅलिफोर्नियाच्या ऑकलँड शहरात स्थायिक झाला होता. सासष्टीच्या धर्मापूर येथे एथनचे मूळ घर आहे. त्याच्या मृत्यूचे वृत्त समजताच धर्मापूर परिसरात शोककळा पसरली आहे. एथन हा मडगावातील मनोविकास शिक्षण संस्थेचा माजी विद्यार्थी होता. त्याचे बालपण सासष्टी तालुक्यात गेले असून कॅलिफोर्नियात असूनसुद्धा तो आपल्या गोव्यातील मित्रांच्या कायम संपर्कात होता.

सविस्तर माहितीनुसार 27 जानेवारी रोजी ऑकलँड ईस्ट लेक येथील त्याच्या घरापासून अवघ्या वीस मिनिटांच्या अंतरावर ड्रॅग रेस शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. ड्रॅग रेसचा चाहता असलेल्या एथनला ती संधी चुकवायची नव्हती.

तो आपल्या मित्रांसह रेस पाहण्यासाठी गेला होता. पुढे घडणार्‍या घटनेची कोणतीही कल्पना नसलेल्या एथनच्या आयुष्यातील ती शेवटची ड्रॅग रेस ठरली. डोनट्स हा प्रकार सुरू असताना एका कारचा ताबा सुटून ती गाडी थेट प्रेक्षकांवर जाऊन आदळली. त्यामुळे प्रेक्षकांमधील काही संतप्त युवकांनी अंधाधुंदपणे गोळीबार करण्यास सुरू केले. त्या गोळीभरात बरेच लोक जखमी झाले होते. त्यात एथनचाही समावेश होता. पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यात गोळीबारापासून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी शेकडो लोक पळताना दिसत आहेत. एथन याच्यासह ड्रॅग रेस पाहण्यासाठी गेलेले अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत व त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असे वृत्त ऑनलाईन मीडिया हाऊस च्या माहितीतून समोर आले आहे. ओकलँड सिटी कौन्सिलचे अध्यक्ष नोएल गॅलो यांनी मीडिया हाऊसला दिलेल्या माहितीनुसार, ड्रॅग रेस दरम्यान, अज्ञाताकडून लेसर लाईटस्चा वापर करण्यात आला. त्यामुळे कवायती करणार्‍या कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले व अपघात झाला. सुरुवातीला एकाने गोळीबार सुरू केला होता. नंतर इतरांनीही गोळ्या चालवल्या.

अंत्यसंस्कार 10 रोजी...

ही घटना घडल्यानंतर ऑकलँड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती पण गोळीबार करणारे तेथून पसार झाले होते. गोव्यातील त्याच्या मित्राकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे त्याचे आई-वडील मूळ केपेच्या पारोडा गावचे रहिवासी आहेत. त्याच्या मृत्यूची बातमी कळताच कॅलिफोर्नियातील गोमंतकीयांनी त्याच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले आहे. 10 फेब्रुवारी रोजी ऑकलंड येथील स्मशानभूमीत त्याच्या पार्थिवावर अंतिम संस्कार केले जाणार आहेत. गोव्यातून त्याचे नातेवाईक कॅलिफोर्नियासाठी रवाना झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT