खेड : पुढारी वृत्तसेवा
सावंतवाडीतील तरुणाने स्वप्नात एक व्यक्ती मदत मागतोय, असे खेड पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिसांनी शोध घेतला असता भोस्ते घाटात दि. १७ रोजी सांगाडा सापडला. मात्र, मृत व्यक्ती कोण हे शोधण्याचे पोलिसांसमोर आव्हान असतानाच ही माहिती देणाऱ्या योगेश आर्या बाबतही गूढ माहिती पुढे येत आहे.
मृत व्यक्तीने आत्महत्या केली की, त्याचा घातपात झाला हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी सिंधुदुर्ग, रत्नागिरी नंतर गुजरातमधील सुरत या ठिकाणाचा आर्या सोबत संबंध असल्याची माहिती समोर येत आहे.
मात्र, त्यामुळे या प्रकरणाचा गुंता वाढतच चालला आहे. या मृतदेहाचे गूढ उकलण्यात मात्र अद्याप पोलिसानं यश आलेले नाही. मुंबई-गोवा महामार्गालगत भोस्ते घाटातील जंगलात अज्ञात व्यक्तीविषयी माहिती पोलिसांना देणाऱ्या योगेश आर्या या तरुणाच्या जबाबात पोलिसांनी चौकशी सुरू केल्यानंतर विसंगती असल्याची बाब समोर येत आहे.
त्याने मृतदेह शोधासाठी केलेला सावंतवाडी ते खेड प्रवास पोलिसांत दिलेली माहिती आणि मित्रांकडून व तो ज्या माणसाला खेडमध्ये भेटला त्याच्याकडून पोलिसांना मिळालेली माहिती यामध्ये तफावत आढळत आहे.
त्यातच योगेश एकतर्फी प्रेमात असल्याने मानसिक रुग्ण असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे पोलिस त्याच्याकडून माहिती मिळवण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेण्याचा विचार करत आहेत. दरम्यान, योगेश पिंपळ आर्या (३० रा. सावंतवाडी आजगांव) याचे स्वप्न वगळता त्या अनोळखी मृतदेहासोबत नक्की काय कनेक्शन आहे याचा शोध घेणे आवश्यक आहे.
मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी पोलिस कसून तपास करत आहेत. खेड, गोवा, सिंधुदुर्गमधील बेपत्ता झालेल्यांची पोलिस माहिती घेत आहेत. आर्या गोव्यात खासगी कंपनीत काम करत होता. मित्रांबरोबर तो गोव्यात राहत असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी गोव्यातही त्याची चौकशी केली. गोव्यातील मित्रांकडूनही योगेश विषयी जाणून घेण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला.
योगेश आर्या हा पणजीत एका खासगी आस्थापनात कामाला आहे. तो आल्त बेती-पर्वरी येथील स्वामी समर्थ मंदिराजवळ मित्रांसोबत भाड्याच्या खोलीत राहतो. खेड पोलिसांनी त्याच्या आस्थापन आणि खोलीचीही पाहणी केली. यावेळी भोस्ते येथे मृतदेहाजवळ सापडलेल्या बॅगेतील कपड्यांप्रमाणेच खोलीत त्याचे कपडे उलटेच टांगलेले होते. तसेच त्याच्या बॅगेतील कपडेही उलटे आढळल्याने पोलिसही चक्रावले आहेत. त्यामुळे या उलट्या कपड्यांचे नेमके रहस्य काय, याचा शोध पोलिस घेत आहेत.