पणजी : पाटो पुलाजवळील एका पबमध्ये दारूच्या नशेत गोंधळ घालून महिला सुरक्षारक्षकाची छेड काढल्याप्रकरणी दोन पोलिसांचे निलंबन करण्यात आले आहे. ही घटना बुधवार, दि. 23 जुलै रोजी रात्री घडली. संबंधित महिला सुरक्षारक्षकाने याबाबतची तक्रार नोंदवल्यानंतर दुसर्याच दिवशी पणजी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, ओंकार जाधव आणि मयूर नाईक या दोघा पोलिसांनी पीडितेचा विनयभंग केला व अपमानजनक वर्तन केले. एवढ्यावरच न थांबता, पीडितेच्या डोक्यावर मोबाईल फोनने हल्लाही केला. त्यामुळे तिला दुखापत झाली. महिला सुरक्षारक्षकाच्या तक्रारीच्या आधारे दोघांवर भारतीय न्याय संहितेच्या कलम 74, 79, 118, 352 सह कलम 3(5) अंतर्गत दोघांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. वैद्यकीय तपासणीसाठी नेत असताना त्यांनी पणजी पोलिस ठाण्यात धिंगाणा घालून महिला उपनिरीक्षकांना शिवीगाळ करीत धमकीही दिली. निरीक्षक विजय चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस उपनिरीक्षक सपना गावस पुढील तपास करत आहेत.
उत्तर गोवा पोलिस अधीक्षक कार्यालयात कार्यरत असलेल्या या दोघा पोलिस कर्मचार्यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्यासोबत उपस्थित असलेल्या तिसर्या पोलिस कर्मचार्यालाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे, अशी माहिती उत्तर गोवा पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिली.