गोवा

भाजपचा बालेकिल्ला जोशुआ राखतील का?

Mapusa BJP Stronghold Joshua-म्हापसा मतदारसंघात हालचाली; उच्चशिक्षित मतदारांची मते ठरतील निर्णायक

पुढारी वृत्तसेवा

म्हापसा : रमेश नाईक

एकेकाळी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा मजबूत बालेकिल्ला असलेला म्हापसा मतदारसंघ सध्या भाजपमय झालेला आहे. आता भाजपचा बालेकिल्ला म्हणून संबोधल्या जाणाऱ्या या मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीत बदल घडवून आणण्याची क्षमता विरोधकांत निर्माण होऊ शकते का? असा प्रश्न या मतदारसंघात चर्चिला जात आहे. २६ हजार मतदार असलेला हा मतदारसंघ सांस्कृतिकदृष्ट्या तसेच येथील बाजारपेठेसाठी प्रसिद्ध आहे.

या म्हापसा शहरातील उच्चशिक्षित समाजाच्या निर्णायक भूमिकेवर मतदार संघाचे भवितव्य अवलंबून असेल. या मतदारसंघात वैश्य समाजासह भंडारी समाजाचे वर्चस्व बरेच आहे, तसेच ख्रिश्चन मतदारही या मतदारसंघात प्रभाव टाकू शकतात. म्हापसा बाजारपेठ व्यापारी संघटना, डोंगराळ भागातील एकता नगर, कुचेली परिसरातील झोपडपट्टी, असे काही घटक येथील निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावत असतात.

या मतदारसंघाचे नेतृत्व भाजपचे जोशुआ डिसोझा करीत आहेत. २०२२ च्या निवडणुकीत काँग्रेसचे सुधीर कांदोळकर यांनी त्यांना जबरदस्त आवाहन दिले होते. २०१९ मध्ये तत्कालीन आमदार तथा उपमुख्यमंत्री अॅड. फ्रान्सिस डिसोझा यांच्या मृत्यूनंतर पोटनिवडणुकीत भाजपने त्यांचे पुत्र जोशुआ यांना उमेदवारी दिली होती.

फ्रान्सिस डिसोझा यांचे पुत्र म्हणून जनतेने त्यांना निवडून दिले तर २०२२ च्या निवडणुकीत त्यांना बरेच परिश्रम करावे लागले. त्यांना निवडून आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांना जोर लावावा लागला. कारण त्यांच प्रतिस्पर्धी काँग्रेसचे सुधीर कांदोळकर यांना आमदार मायकल लोबो यांचे समर्थन लाभले होते. २०२७ च्या निवडणुकीसाठी पण बऱ्याच इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विद्यमान आमदार जोशुआ डिसोझा यांच्यावर खुद्द येथील भाजपचे बरेच कार्यकर्ते नाराज आहेत.

कांदोळकर, नार्वेकर यांच्या भूमिकेकडे लक्ष

दोन निवडणुकीत अपयशी ठरलेल्या सुधीर कांदोळकर यांना काँग्रेस पक्ष पुन्हा उमेदवारी देतो की ते दुसऱ्या पक्षातून निवडणूक लढवतात, हे पाहावे लागेल. लोकसभेची उमेदवारी नाकारल्याने नाराज झालेले विजय भिके हे सुद्धा प्रबळ दावेदार मानले जातात, तसेच युवा नेते तथा उत्तर गोवा काँग्रेस अध्यक्ष शशांक नार्वेकर यांनीही उमेदवारीसाठी आपला दावा निर्माण केला आहे व काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. प्रतीक्षा खलप या महिला उमेदवार म्हणून उमेदवारीवर दावा करू शकतात.

उमेदवारीसाठी होणार गर्दी

गेल्या निवडणुकीत या मतदारसंघातून आम आदमी पक्ष, तृणमूल काँग्रेस पक्ष, रिव्होल्यूशनरी गोवन्स पक्ष अशा काही राजकीय पक्षांकडूनही उमेदवार रिंगणात होते. २०२७ ची निवडणूक जसजशी जवळ येईल तसे अनेक उमेदवार उमेदवारीसाठी पक्षांची दारे ठोठावतील. २०२७ ची निवडणूक चुरशीची होईल, असे दिसत असून यावेळी म्हापसा मतदार संघात काहीतरी वेगळे घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT