विठू सुकडकर
सासष्टी : राज्यात जिल्हा पंचायत निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्यभरात सर्वत्र निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. सासष्टीतील सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी सक्रिय झाले आहेत. सत्ताधारी भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे दामू नाईक यांच्या हाती आहेत. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये सासष्टी तालुक्यातून भाजपला फारसे यश मिळालेले नाही. त्या पार्श्वभूमवर येणार्या जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीत दामू नाईक चमत्कार घडवून आणणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात दामूंचा कस लागणार आहे.
सासष्टी तालुक्यात माजोर्डा, बाणावली, वेळ्ळी, नावेली, दवर्ली, गिर्दोली, कुडतरी, राय व नुवे मिळून जिल्हा पंचायतीचे नऊ मतदारसंघ आहेत. सासष्टी तालुका हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. त्या काळात भाजपचे एकमेव जिल्हा पंचायत सदस्य उल्हास तुयेकर हे सलग तीनवेळा दवर्ली मतदारसंघातून निवडून आले होते. त्यानंतर परेश नाईक यांनी जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपचा हा गड अजूनपर्यंत राखून ठेवला आहे.
यापूर्वी गिर्दोली मतदारसंघातून क्लाफासियो डायस हे जिल्हा पंचायत निवडणुकीत निवडून आले होते. नंतरच्या काळात डायस हे काँग्रेसच्या उमेदवारीवर कुंकळ्ळीचे आमदार झाले. दोन वर्षांनंतर डायस यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश केला. तसेच काँग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनीही भाजपात प्रवेश केला. त्यामुळे मागच्या दोन जिल्हा पंचायत निवडणुकीत वरील दोन्ही नेत्यांच्या पाठबळावर गिर्दोली मतदारसंघ भाजपकडे आला होता. सध्या जिल्हा पंचायतीच्या अध्यक्षा संजना वेळीप या गिर्दोलीच्या जिल्हा पंचायत सदस्य आहेत. त्यामुळे सध्या सासष्टी तालुक्यात भाजपकडे दोन जिल्हा पंचायत सदस्य आहेत.
दामूंच्या रणनीतीकडे लक्ष
भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक हे पक्ष बळकटीसाठी मोठ्या जोमाने काम करताना दिसतात. पक्षातील अंतर्गत वादविवाद, क्षुल्लक गोष्टींवरून मतभेद होऊन पक्षापासून दुरावलेल्या माजी नेत्यांना एकत्र आणण्याचे काम सध्या त्यांनी केले आहे. प्रदेशाध्यक्ष पदाच्या कारकिर्दीच्या प्रारंभाला त्यांनी जिल्हा पंचायत निवडणुकीच्या कामाला सुरुवात केली आहे. बरेच ख्रिस्ती नेते व ख्रिस्ती मतदारांना त्यांनी पक्षाकडे आकर्षित केले आहेत. सासष्टी तालुक्यात जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारीवर जास्तीत जास्त जिल्हा सदस्य निवडून आणणे त्यांची जबाबदारी आहे. त्यासाठी दामू नाईक कशी रणनीती आखतात आणि सासष्टीवर भाजपचे वर्चस्व कसे आणतात, हे पाहावे लागणार आहे.
काँग्रेसची घडी विस्कटली
गेल्या वीस-पंचवीस वर्षांपूर्वी सासष्टी तालुका हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र, जिल्हा पंचायत निवडणुकीत दवर्ली मतदारसंघात उल्हास तुयेकर यांनी कठोर परिश्रम व मेहनतीने भाजपचा झेंडा फडकावला. नंतरच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस व आम आदमी पार्टी विधानसभा व जिल्हा पंचायत निवडणुकीत सक्रिय बनल्याने काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला मोठे खिंडार पडले. सासष्टीत आमदाराबरोबर जिल्हा पंचायत सदस्यांच्या संख्येला गळती लागली. आता रिव्होल्युशनरी गोवन्स व गोवा फॉरवर्ड पक्ष निवडणुकीत सक्रिय बनल्याने काँग्रेस पक्षाला एका मागून एक धक्के बसत आहेत. सध्या राज्यातही काँग्रेसची राजकारणातली घडी विस्कळीत झालेली आहे. त्याचा लाभ भाजपला मिळत आहे.