साध्वी सैल गोमंतकीय कशी?
कारवारच्या आमदारांची मुलगी साध्वी सैल हिला मिस इंडिया किताब मिळालेला आहे. ती गोवेकर असल्याचे सांगत तिचा भव्य स्वागत सोहळाही पार पडला. मात्र, साध्वी सैल ही कारवारच्या आमदाराची मुलगी असल्याने ती गोवेकर कशी? असा प्रश्न अनेकजण सोशल मीडियावर विचारत आहेत. याबाबत अद्याप कुणीच स्पष्टीकरण दिलेले नाही.
जीत यांचे शक्तिप्रदर्शन
जीतभाई गुरुवारी जीत आरोलकर यांनी आपला वाढदिवस अगदी धूमधडाक्यात साजरा केला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्यासह अनेकांनी त्यांना भेटून शुभेच्छा दिल्या. मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनीही त्यांचे अभीष्टचिंतन केले. आश्चर्य म्हणजे कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी त्यांना शुभेच्छा देऊन आलिंगनही दिले. मध्यंतरी मायकल मांद्रेतही तयारी करत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यावरून 'तू तू मैं मैं' झाली होती, पण आता सगळे आलबेल आहे असे जीतचे कार्यकर्ते सांगतात.
निवडणूक चर्चाना ऊत
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व प्रदेशाध्यक्ष दामू नाईक हे परवा दिल्लीला भेट देऊन परतले. त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन, ज्योतिरादित्य सिंदिया व इतर काही नेत्यांची भेट घेतली. यावेळी संघटन मजबूत करा व निवडणुकीच्या तयारीला लागा असा संदेश देण्यात आला आहे. नारीशक्ती वंदन विधेयक फेटाळले गेल्यानंतर आपल्यापुरते नारीवंदन करण्याचा विचारही झाल्याची माहिती मिळते. एखाद्या महिला आमदाराला मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे
....आणि विजय सुटले
नगर नियोजन खात्याचे (टीसीपी) कलम रद्द करावे, यासाठी आंदोलन करताना विरोधी पक्षांचे आमदार व लोक नगर नियोजन खात्याचे मंत्री विश्वजित राणे यांच्या बंगल्यावर चाल करून गेले होते. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल होऊन सध्या त्यांची पोलीस चौकशी सुरू झाली आहे. काँग्रेसचे तीन, आपचे दोन व आरजीचा एक आमदार यांची चौकशी सुरू आहे. मात्र, त्यामध्ये गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई नाहीत, कारण ज्या दिवशी आझाद मैदानावरून विरोधी आमदार विश्वजित राणे यांच्या बंगल्याकडे जात होते, त्यावेळी सरदेसाई यांनी आपण काही बकरी नाही कुणाच्याही मागून जायला म्हणत इतरांसोबत जाण्यास नकार दिला होता. त्यामुळे ते सुटले.
चर्चा दुसऱ्या मंत्रिपदाची
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व प्रदेशाध्यक्ष दिल्लीतून आल्यावर अचानक मंत्रिमंडळ फेररचनेचीही चर्चा सुरू झाली. गेल्या ऑक्टोबरपासून चर्चा सुरू आहे की रवी नाईक यांच्या जागी कोणाची मंत्रिपदी वर्णी लागणार? मात्र गेले सात आठ महिने हे पद रिक्तच आहे. अचानक एक नव्हे तर दोन मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची चर्चा सुरू आहे. आता डच्चू मिळणारा मंत्री कोण याबाबतही चर्चांना उधाण आले आहे. रितेश नाईक यांना मंत्री केले तर त्यांना सहा महिन्यांत निवडून यावे लागेल. प्रस्तावित निवडणूक मार्च २०२७ मध्ये होणार आहे. त्यामुळे नियमित वेळेत निवडणूक झाल्यास अजूनही जवळपास वर्षभराचा कालावधी आहे. यावर दोन उपाय आहेत. रितेश नाईकना आता मंत्री करून सहा महिने झाले की त्यांना राजीनामा द्यायला लावायचा व दुसऱ्या आमदाराची वर्णी लावायची. म्हणजे दोन आमदार खुश होतील. किंवा हे मंत्रिपद अजून थोडे पुढे ढकलून सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये द्यावे. म्हणजे तोपर्यंत निवडणूकही येईल. आता भाजप काय ठरवते हे पाहायचे. एका मंत्र्यासाठी निवडणूक ऑक्टोबरमध्ये होईल हे जरा कठीण वाटते. असलेला कालावधी कमी करून निवडणुकीला
आमदाराचा खट्टरवर हल्लाबोल
सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबद्दल केलेल्या अपमानकारक विधानांचा निषेध करणाऱ्या अनेक आवाजांच्या गर्दीत, कुडतरीचे अपक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांचे विधान लक्षवेधी आहे. ते म्हणाले की, अशा प्रकारच्या घडामोडी पाहण्यासाठी आपण 'भगव्या विचारसरणीच्या सरकारला' पाठिंबा दिला नव्हता. उलटपक्षी, त्यांनी मुख्यमंत्र्यांना जोरदार आवाहन केले की, त्यांनी त्वरित पावले उचलावीत, अन्यथा शांत असलेल्या या राज्यात डोके वर काढणाऱ्या कोणत्याही जातीयवादी प्रवृत्तींना वेळीच रोखावे. रेजिनाल्ड यांच्या या भूमिकेवर 'भगव्या ब्रिगेडची' काय प्रतिक्रिया येते, हे पाहावे लागेल.
आता हिंदूंचा आक्रोश मोर्चा
सेंट झेवियर यांच्याविरोधात विधान केल्याबद्दल गौतम खट्टर यांना व त्यांच्या भावाला गोवा पोलिसांनी त्वरीत अटक केली, कारण अल्पसंख्याकांनी त्यांच्या विरोधात अनेक पोलीस स्थानकांत तक्रारी दाखल केल्या होत्या. या काळात काहींनी हिंदूंच्या देवतांविरोधात सोशल मीडियावर खालच्या दर्जाची टीका केली. हिंदूंच्या भावना दुखावल्यामुळे अनेक संघटनांनी पोलिसांत तक्रारी केल्या. मात्र, संबंधितांना अद्याप अटक न केल्याबद्दल हिंदुत्ववादी संघटनांतर्फे २ मे रोजी पणजीत आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. एका विधानावरून हा सर्व असंतोष पसरला आहे.
पाऊसकर कचाट्यात
माजी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दीपक पाऊसकर हे सध्या न्यायालयीन कचाट्यात सापडले आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशना वेळी सावर्डे मतदार संघातील बंधाऱ्याला विरोध करणाऱ्या व विधानसभेत फलक झळकावणाऱ्या चार नागरिकांना त्यांनी विजय सरदेसाईंच्या माध्यमातून विधानसभेमध्ये आणल्याचा त्यांच्यावर ठपका आहे. ते स्वतः विधानसभेत आले नसले तरी त्या चार व्यक्तींनी विधानसभेमध्ये पोस्टर झळकावून विधानसभा नियमांचा भंग केला. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा नोंद झालेला आहे. त्यांच्या सोबत पाऊसकर यांच्यावरही गुन्हा नोंद झालेला आहे. पाऊसकर सावर्डे मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहू इच्छितात, मात्र निवडणुकीला अवघे आठ ते दहा महिने असतानाच त्यांच्यावर गुन्हा नोंद झाल्यामुळे ते आता कचाट्यात सापडले आहेत.
... त्यांची पाण्याची सोय करा
चिंबल पंचायत क्षेत्रातील बेकायदेशीर बोअरवेल्स न्यायालयाच्या आदेशानुसार सरकारने सील केल्या आहेत. त्यामुळे तेथील नागरिकांची बरीच पंचाईत झाली आहे. बोअरवेल सील करते वेळी लोकांनी जोरदार विरोध केला होता. मात्र, पोलिस संरक्षणात या बोअरवेल्स सील करण्यात आल्या. या बोअरवेल्स बेकायदेशीर असल्याची तक्रार पंचायत क्षेत्रातील नागरिकांनीच केली होती. न्यायालयाच्या निर्देशानुसार या बोरवेल्स सील केल्या तरी त्या लोकांना ऐन उन्हाळ्यात पाण्याची सोय करणे गरजेचे आहे. तो त्यांचा हक्क आहे. सरकार त्यावर काय तोडगा काढते ते पाहावे लागेल.
दरोडेखोरांच्या भीतीने त्रस्त
परवाच गोवा पोलिसांनी बांगलादेशी दरोडेखोरांना अटक करून गोव्यात आणले. हे लोक दिवसा रेकी करून रात्री दरोडे टाकायचे असे पोलिसांनी सांगितले आहे. शहरातून कचरावाले, प्लास्टिकवाले, रद्दीवाले किवा गोव्याबाहेरून आलेले अनेक प्लंबर, फिटर व इतर व्यवसाय करणारे घरात येत असतात. कोणावर विश्वास ठेवावा हेच लोकांना कळत नाही झाले आहे. लोक तर भीतीने आता जनगणना करणाऱ्यांनाही गेटबाहेरच उभे करून त्यांना परस्पर कटवतात. रणरणत्या उन्हात फिरणाऱ्या या लोकांना कुणी पाणीही विचारत नाही ही सत्यस्थिती आहे.
तारीख पे तारीख
पर्वरी उड्डाणपुलासाठी तारीख पे तारीख देणे सुरू आहे. अगोदर मे २०२६ पर्यंत हे काम पूर्ण होईल असे सांगण्यात आले होते. मे उजाडला आणि आता चतुर्थीपर्यंत पूल खुला होणार असे सांगण्यात येत आहे. मंत्री पुन्हा पुन्हा भेटी देतात आणि नवनवीन तारखा जाहीर करतात. रोज या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांचे काय हाल होत आहेत याच्याशी कोणाचे काही देणेघेणे आहे की नाही हेच कळत नाही. आपल्या नशिबी आता हेच आहे असे म्हणून लोकांनी आवाज उठवणेही बंद केले आहे. त्यांचे आता तारखांकडेही लक्ष नाही. ज्या दिवशी उड्डाणपूल खुला होईल ते खरे