Babu Nayak Pudhari photo
गोवा

Who is Babu Nayak: गोव्याच्या अस्मितेचा जागता लोकनायक, कोण होते बाबू नायक?

Who is Babu Nayak: गोव्याच्या अस्मितेचा जागता लोकनायक : बाबू नायक

पुढारी वृत्तसेवा

गोव्याच्या मातीशी नाळ जोडलेला आणि गोव्याच्या हिताला सर्वाधिक प्राधान्य देणारा नेता म्हणून बाबू नायक यांचे नाव आजही आदराने घेतले जाते. जनमत कौलाच्या चळवळीपासून राजकीय संघर्षापर्यंत त्यांनी गोव्याची स्वतंत्र अस्मिता जपण्यासाठी अखेरपर्यंत लढा दिला. सत्तेच्या राजकारणात अनेक चढ-उतार आले. परंतु, तत्त्वांशी तडजोड न करण्याची त्यांची भूमिका कायम राहिली. नायलॉन ६, ६ सारख्या प्रदूषणकारी प्रकल्पाला विरोध करताना त्यांनी दाखवलेली तडफ त्यांच्या गोवाप्रेमाची शेवटची ठळक साक्ष ठरली.

अनंत उर्फ बाबू नायक यांचा जन्म १९ ऑगस्ट १९२७ रोजी गोकुळाष्टमीच्या दिवशी गावणे येथे झाला. १९४८ मध्ये महात्मा गांधींच्या कोलवा येथे झालेल्या अस्थी विसर्जनाच्या कार्यक्रमात सहभागी होत त्यांनी राष्ट्रीय आणि सामाजिक कार्याची सुरुवात केली. पुढे विविध सामाजिक उपक्रमांत सक्रिय सहभाग घेत त्यांनी समाजकार्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली. १९५६ मध्ये नीळकंठ विठ्ठल दळवी यांचा जाहीर सत्कार घडवून आणणे हे त्यांच्या सामाजिक कार्यातील महत्त्वाचे पाऊल ठरले.

हिंदू सभेचे अध्यक्ष म्हणून १९६५ मध्ये मठ ग्रामस्थमध्ये त्यांची निवड झाली. वडील नरसिंह नायक यांच्यासोबत ते युनायटेड गोवन्स पार्टीमध्ये सक्रिय झाले. १९६६ मध्ये वडिलांच्या निधनानंतर त्यांच्यावर पक्षाच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी आली. १९६७ च्या जनमत कौलाच्या चळवळीत त्यांनी झोकून देऊन काम केले आणि गोव्याचे स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवण्याच्या लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

त्याचवर्षी युनायटेड गोवन्सच्या उमेदवारीवर ते मडगावचे आमदार म्हणून प्रथमच निवडून आले. त्यानंतर १९७२, १९७७ आणि १९८० मध्येही मडगावकरांनी त्यांना सलग विजयी केले. अभ्यासू, आक्रमक आणि विधायक विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी विधानसभेत आपला ठसा उमटवला.

१९७५ मध्ये युनायटेड गोवन्स पार्टीत फूट पडली. बदलत्या राजकीय परिस्थितीचा अंदाज घेत बाबू नायक यांनी ‘युगो’ काँग्रेसमध्ये विलीन केला. १९८० मध्ये काँग्रेसच्या विजयासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आणि प्रतापसिंह राणे यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी पुढे केले. मात्र १९८४ मध्ये मडगावमधून त्यांचा पराभव झाला. १९८९ मध्ये अपक्ष म्हणून ते पुन्हा विजयी झाले.

१९९० मध्ये नायलॉन ६, ६ या प्रदूषणकारी प्रकल्पाला गोव्यात विरोध सुरू झाल्यानंतर त्यांच्या अध्यक्षतेखाली सभागृह समिती स्थापन झाली. त्यांनी प्रकल्पाच्या विरोधात अहवाल सादर करून पर्यावरण आणि गोव्याच्या हिताची बाजू घेतली. १९९४ मध्ये त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली. ३० एप्रिल १९९९ रोजी त्यांचे निधन झाले. मात्र गोव्याच्या अस्मितेसाठी लढलेला त्यांचा संघर्ष आणि लोकहिताला दिलेले प्राधान्य आजही त्यांच्या कार्याची अमिट ओळख आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT