पणजी : पुढारी वृत्तसेवा सध्या गोवा सरकार स्थिर आहे. हवे तेवढे आमदारांचे पाठबळ सरकारला आहे. त्यामुळे आणखी आमदारांची गरज वाटत नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. एका वृत्तवाहिनीशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. सरकार स्थिर असताना आणखी आमदारांची गरज काय? असा प्रतिप्रश्न त्यांनी विचारला.
ते म्हणाले, आपण धार्मिक भेदभाव मानत नाही. मात्र, आमिषे दाखवून धर्मांतर केले जात असेल तर खपवून घेणार नाही. आवश्यकता भासली तर त्यासाठी धर्मांतरबंदी कायदा राज्यात केला जाईल. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत गोव्यातील दोन्ही जागा भारतीय जनता पक्ष जिंकणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. काँग्रेसचे सरकार केंद्रात सत्तेवर असताना राज्यांना मदत देताना हात आखडते घेत होती. या उलट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने सर्व राज्याना आर्थिक मदत करत आहे. केंद्र सरकारने गोव्याला 22 कोटी दिले, तर इतर विकास प्रकल्पासाठी करोडो रुपये निधी मिळत आहे. केंद्राच्या विविध योजनांच्या माध्यमातून गोव्याला 5 हजार कोटी मिळाल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.