goa  
गोवा

Goa Fest | गोवा फेस्तमधील अनोखी परंपरा; नवस फेडण्यासाठी मेणाच्या अवयवांची जोरदार मागणी

Goa Fest | नवस फेडण्यासाठी मेणाच्या अवयवांची भाविकांकडून खरेदी

पुढारी वृत्तसेवा

पणजी : प्रभाकर धुरी

शरीरात दुखणे किंवा कोणता आजार असेल, तर ज्या अवयवात वेदना असतात त्या अवयवाचा नवस बोलण्याची परंपरा खूप जुनी आहे. दुखणे कमी झाले किंवा बरे वाटले की त्या अवयवाचा मेणाचा बनवलेला प्रतिकात्मक अवयव देवासमोर अर्पण करून नवस फेडला जातो. हिंदू धर्मात मंदिरात तर ख्रिश्चन धर्मीय चर्चमध्ये अवयव अर्पण करतात.

जुने गोवे येथे संत फ्रान्सिस झेवियर यांचे बुधवार, दि. ३ डिसेंबर रोजी फेस्त आहे. मोठ्या श्रद्धेने नवस बोलणारे भक्त या फेस्तात मेणाचे अवयव अर्पण करणार आहेत. यासाठी फेस्तात मेणाचे हात, पाय, नाक, कान, डोळे, माणूस, घर, हृदय, मूल अशा प्रतिकात्मक वस्तूंची विक्री सुरू आहे. देशी व विदेशी यात्रेकरूंकडून मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे.

फेस्तात डिचोली येथील दीपक तुकाराम पालयेकर भेटले. ते म्हणाले, “मी १९९० पासून फेस्ताला येतो. सुरुवातीला मी वाती म्हणजे बारीक मेणबत्त्या विकायचो. पण नंतर इतरांना पाहून मीही मेणाचे अवयव विकायला सुरुवात केली. २४ नोव्हेंबर ते ३ डिसेंबरपर्यंत मी हे काम करतो.

पूर्वी खूप गर्दी असायची, पण आता पोटापुरता नफा होतो. ग्राहकांची समस्या ऐकून त्यांच्या मागणीनुसार अवयव किंवा इतर वस्तू देतो. हे सर्व अवयव मी दुसरीकडून बनवून आणतो.”

काही शंकराच्या मंदिरातही हीच परंपरा

सिंधुदुर्गातील दोडामार्ग तालुक्यातील तेरवण मेढे येथील पांडवकालीन श्री नागनाथ मंदिरातही अशीच प्रथा पाळली जाते. येथे धातूपासून हात, पाय, कान, डोळे, माणूस अशा प्रतिकात्मक वस्तू बनवून मंदिराजवळच्या तळ्यात अर्पण केल्या जातात. अनेक शिवमंदिरांमध्येही ही परंपरा भक्तिभावाने पाळली जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT