डिचोली : मराठी हे गोव्याचे भवितव्य आहे. मतदान हा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. हे शस्त्र मराठीप्रेमींच्या हाती आहे. त्यामुळे जो उमेदवार मराठी भाषेला पाठिंबा देणार नाही, त्याला यावेळी मत देणार नाही, असा निर्धार मराठीप्रेमींनी करावा. भाजपने श्री देव बोडगेश्वरासमोर दिलेले आश्वासन पाळावे, असे आवाहन गोवा मराठी राजभाषा निर्धार समितीचे निमंत्रक प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांनी रविवारी साखळी येथील खेडेकर सभागृहात आयोजित प्रखंड मेळाव्यात केले.
यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ मराठी प्रेमी गो. रा. ढवळीकर, दिवाकर शिक्रे, शानूदास सावंत, दामोदर नाईक, प्रा. नारायण गावस, अभय सावंत, बाबाजी गावकर, गिरीश सावईकर व साखळी निमंत्रक नितेश नाईक उपस्थित होते.
प्रा. वेलिंगकर म्हणाले, 40 वर्षे मराठीचा लढा लढणार्यांच्या लढ्याकडे सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे पुन्हा हा लढा तीव्र केला जात आहे. आतापर्यंत 16 प्रखंड मेळावे झाले. आणखी दोन झाल्यावर प्रखंड समित्या व ग्रामसमित्यांची स्थापना होऊन लढा तीव्र केला जाईल. 2017 साली भाजपने भाषा सुरक्षा मंचची ताकद पाहिली आहे. आमदारांची संख्या 21 वरून 13 झाली होती, याची जाणीव भाजपने ठेवावी.
गोव्यात लाखो मराठीप्रेमी आहेत, त्यांच्यात विश्वास जागृत केला जातोय. येत्या काळात संख्या वाढेल. मराठी सहभाषा असे सांगून सरकार मराठीप्रेमींची फसवणूक करत आहे. विविध नोकर्यांसाठी कोकणी सक्तीची करून सरकार मराठी शिकून सरकारी नोकरी मिळणार नाही, असा संदेश देत आहे. त्यामुळे मराठीची व्होट बँक तयार करणे गरजेचे आहे. अराष्ट्रीयकरण करण्यासाठी सरकार अल्पसंख्याकांचे लांगूनचालन करत आहे. त्याला रोखण्यासाठी मराठी राजभाषा व्हायला हवी. येत्या काळात युवा मेळावे होतील. 2026 साली प्रचंड जाहीर सभा घेऊन मराठीप्रेमींची ताकद सरकारला दाखवू.
गो. रा. ढवळीकर म्हणाले, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मराठी बाणा जपावा व मराठीला राजभाषा करावी. निवडणुकीपूर्वी मराठी राजभाषा करा. मराठीप्रेमी भाजपला भरभरून मते देतील. गोव्यात मराठीला हजारो वर्षांचा इतिहास आहे. गोवा मुक्तीपूर्वी नंतरही फक्त मराठीच गोव्याची भाषा होती. खुद्द फादर स्टीफन यांनी मराठीतून लेखन केले आहे. गोव्यातील थोर मराठी साहित्यिकांनी गोव्यासह महाराष्ट्र गाजवला. येवढी गोव्याची मराठी समृद्ध होती. आजही गोव्यात मराठी हीच सांस्कृतिक व साहित्यिक भाषा आहे. म्हणून मराठी गोव्याची राजभाषा व्हायला हवी. गोव्याची मूळ भाषा मराठी तर कोकणी गोवा मुक्तीनंतर भाषा तयार झाली. ती मराठीप्रेमींनीही स्वीकारली आहे. आता मराठीवर झालेला अन्याय दूर करून तिला राजभाषा करावे.
दिवाकर शिक्रे म्हणाले, जीवनभर मराठीसाठी काम केले. पुढेही करणार. 40 वर्षे मराठीचा लढा सुरू आहे. यापुढे मराठीचे वादळ येणार असून मराठीप्रेमींनी या लढ्यात सहभागी व्हावे. मराठी लेखक, कवी यांनी लढ्यात सहभागी होऊन शेवटची संधी आहे ती साध्य करुया. मराठी माणसाशी खेळू नका, झळ बसेल असे शिक्रे म्हणाले. प्रास्ताविकात गिरीश सावईकर म्हणाले, मराठीला 2500 वर्षाची परंपरा आहे म्हणून तिला मराठी गोव्याची सांस्कृतिक भाषा. म्हणून तिला राजभाषा करणे गरजेचे आहे. सूत्रसंचालन प्रणव बाक्रे यांनी केले, आभार प्रा. नारायण गावस यांनी मानले. नारायण गावस यांनी ‘मराठीची महती’ ही परेश प्रभू यांची मराठीची महती सांगणारी कविता सादर केली. पसायदानाने मेळाव्याची सांगता झाली.