मडगाव : रक्तचाचणी आणि अतिदक्षता विभागाविषयी चर्चा करताना आरोग्यमंत्री विश्वजित राणे. Pudhari File Photo
गोवा

विश्वजित राणे यांचा सरकारवर पुन्हा हल्लाबोल

पुढारी वृत्तसेवा

मडगाव : पुढारी वृत्तसेवा

आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी शुक्रवारी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाला अचानक भेट देत कामकाजाची पाहणी केली. दर दिवशी साडेसहाशेपेक्षा जास्त रुग्णांना वैद्यकीय उपचार पुरवणार्‍या जिल्हा इस्पितळाला, सरकारने गोमेकॉच्या धर्तीवर सर्व प्रकारच्या वैद्यकीय सुविधा प्राप्त करून देणे आवश्यक आहे. तसे झाल्यास हे इस्पितळ गोमेकॉप्रमाणे उत्कृष्टतेचे केंद्र बनू शकते. आम्ही अनेकदा चर्चा करतो. मात्र, अंमलबजावणी काही होत नाही, अशा शब्दांत आरोग्यमंत्री राणे यांनी सरकारवर पुन्हा हल्लाबोल केला. दरम्यान, सरकारी नोकर्‍यांवरून सरकारवर तोफ डागली होती. त्यावर प्रदेशाध्यक्ष तानावडे यांनी चर्चा केल्यानंतरही मंत्री राणे यांची नाराजी कायम असल्याचे स्पष्ट झाले.

सरकार पक्षात धुसफूस सुरू असताना आरोग्यमंत्री राणे यांनी फातोर्डातील बहुचर्चित दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाच्या बाबतीत पुन्हा सरकारवर निशाणा साधला आहे. स्वतंत्र हृदयरोग, अस्थिरोग आणि न्यूरोसर्जन विभागांसह इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारकडून प्रयत्न होणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा करून येत्या पाच महिन्यांत जिल्हा इस्पितळातील वैद्यकीय सुविधांची कमतरता दूर करण्यासाठी आपले प्रयत्न असतील. अनेकदा चर्चा होते. मात्र, अंमलबजावणी होत नाही. दक्षिण गोव्याच्या लोकांनी या इस्पितळाच्या बाबतीत पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरकारला गोमेकॉप्रमाणे इथेही सुविधा द्याव्या लागतील, असे मंत्री राणे म्हणाले.

विधानसभा अधिवेशनात दिलेल्या आश्वासनानुसार, जिल्हा इस्पितळाची पाहणी केली आहे. डॉक्टर्स आणि कर्मचार्‍यांची कमतरता आहे. या इस्पितळाचा विषय मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या समोर मांडला जाणार आहे. जिल्हा इस्पितळातील त्रुटींविषयी आरोग्य संचालकांशी चर्चा केली जाणार असल्याचेही मंत्री राणे म्हणाले. अतिदक्षता विभागासह इतर विभागांची मंत्री राणे यांनी पाहणी केली. डॉक्टर्स चांगल्या पद्धतीने रूग्णांना सेवा पुरवत आहेत. जिल्हा इस्पितळात साडेसहाशेहून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. त्यांना उत्तम दर्जाचे जेवण आणि इतर सुविधा सरकारकडून मिळणे आवश्यक असल्याचे मंत्री राणे म्हणाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT