Nashik Kumbh Mela 2027  Pudhari News Network
गोवा

Kumbh Mela 2027 Nashik Trimbakeshwar | महासिंहस्थ कुंभमेळ्याच्या मार्गावरील गावकरी होणार आपत्कालीन मदतीस सज्ज

Kumbh Mela 2027 Nashik Trimbakeshwar | रस्ते व रेल्वेमार्गालगतच्या गावांत मिळणार प्रशिक्षण

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आगामी महासिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर नाशिक व त्र्यंबकेश्वरकडे येणाऱ्या भाविकांच्या मार्गावरील गावांनाही आपत्ती व्यवस्थापनाच्या तयारीत सहभागी करून घेतले जाणार आहे.

प्रमुख रस्ते आणि रेल्वेमार्गापासून ५०० मीटर ते १ किलोमीटर अंतरावरील गावांची निवड करून तेथील नागरिकांना प्राथमिक आपत्कालीन प्रतिसादाचे प्रशिक्षण देण्याचे नियोजन नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने केले आहे.
कुंभमेळ्याच्या काळात लाखो भाविक दाखल होणार असल्याने, केवळ कुंभक्षेत्रापुरती तयारी मर्यादित न ठेवता प्रवासाच्या मार्गावरही प्रतिसाद यंत्रणा सक्षम करण्यावर भर दिला जात आहे. रस्ते किंवा रेल्वे अपघातासारखी दुर्घटना घडल्यास व्यावसायिक बचाव पथके पोहोचेपर्यंत स्थानिक नागरिकांकडून त्वरित प्राथमिक मदत मिळावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

आपत्कालीन परिस्थितीत सुरुवातीची काही मिनिटे अत्यंत महत्त्वाची ठरतात. त्यामुळे स्थानिक नागरिकांना प्राथमिक जिवितरक्षण, प्राथमिक उपचार, शोध व बचाव तसेच अग्निसुरक्षेचे मूलभूत धडे दिले जातील. ही स्थानिक यंत्रणा व्यावसायिक आपत्कालीन सेवांना पूरक मदत म्हणून कार्य करेल. या उपक्रमात आपदा मित्र, एनसीसी (NCC), एनएसएस (NSS) आणि रेडक्रॉस यांसारख्या संस्था व स्वयंसेवकांना जोडले जाणार आहे.


कुंभमेळा प्राधिकरणाच्या व्यापक आपत्ती व्यवस्थापन आराखड्यानुसार, एक हजार प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची ५० एकात्मिक प्रतिसाद पथके उभारली जाणार आहेत. या पथकांना गर्दी व्यवस्थापन, आपत्कालीन प्रतिसाद, धोक्यांची पाहणी आणि संप्रेषण सहाय्याचे प्रशिक्षण दिले जाईल. या बहुस्तरीय नियोजनामुळे व्यावसायिक यंत्रणा, स्वयंसेवक आणि स्थानिक समुदाय यांच्यात उत्तम समन्वय साधून महासिंहस्थ २०२७ साठी सुरक्षित वातावरण निर्माण केले जाणार आहे.

"भाविकांची हालचाल केवळ साधुग्राम किंवा मुख्य स्नानस्थळापुरती मर्यादित नसून संपूर्ण प्रवासाच्या मार्गावर असणार आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाची तयारी कुंभक्षेत्राच्या बाहेरूनच सुरू होणे आवश्यक आहे. या प्रशिक्षणामुळे भाविकांसह स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त संरक्षण व्यवस्था निर्माण होईल."
- शेखर सिंह (आयुक्त, कुंभमेळा प्राधिकरण)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT