MLA Vijay Sardesai pudhari photo
गोवा

Vijai Sardesai | गोव्यात पुन्हा राजकीय उलथापालथ! 'आप'ला सोडचिठ्ठी देत विजय सरदेसाईंची काँग्रेसकडे पुन्हा वाटचाल?

Vijai Sardesai | आम आदमी पक्षाला सोडचिठ्ठी ; लोकाग्रहास्तव काँग्रेसशी जवळीक

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

'गोवा फर्स्ट' आघाडीला सोडचिठ्ठी देत आम आदमी पक्षापासून दूर झालेल्या गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई यांची काँग्रेसकडे पुन्हा वाटचाल सुरू झाल्याची राजकीय चर्चा आहे. २०१७ आणि २०२२ च्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचे अनुक्रमे १० आणि ८ आमदार भाजपमध्ये गेल्याचे कारण पुढे करत सरदेसाई यांनी काँग्रेसवर टीका केली होती.

निवडणुकीनंतर पुन्हा काँग्रेसचे आमदार फुटतील, असा दावा करत त्यांनी 'आप'सोबत 'गोवा फर्स्ट' आघाडी स्थापन केली होती. मात्र, बदलत्या राजकीय घडामोडींनंतर सरदेसाई यांनी पुन्हा काँग्रेससोबत जवळीक वाढवल्याची चर्चा आहे.
गोवा फर्स्ट आघाडीच्या प्रचारासाठी अरविंद केजरीवाल गोव्यात आले होते. 'आप' आणि गोवा फॉरवर्डच्या युतीचे होर्डिंग्स राज्यभर लावून 'काँग्रेसच्या आमदारांवर विश्वास ठेवू नका', असा संदेश देण्यात आला होता.

त्यामुळे फॉरवर्ड काँग्रेससोबत निवडणूक लढवणार नसल्याचे चित्र होते. मात्र, फॉरवर्डने 'गोवा फर्स्ट'मधून बाहेर पडत होर्डिंग्स हटवले असून, सरदेसाई यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेससोबत पुन्हा राजकीय घरोबा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
गोवा फॉरवर्ड आणि काँग्रेसमध्ये गेली अनेक वर्षे युती राहिली आहे. फॉरवर्डचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण करण्याबाबतही चर्चा झाली होती. सरदेसाई यांना विरोधी पक्षनेतेपद हवे होते; मात्र काँग्रेस तयार नसल्याने चर्चा पुढे गेली नाही.

त्यानंतर फॉरवर्डने काँग्रेससोबतची बोलणी स्थगित करून 'आप'सोबत आघाडी केली. दरम्यान, काँग्रेसने आरजीसोबत युतीसाठी बोलणी सुरू केली होती. 'आप' आणि फॉरवर्डकडून काँग्रेसवर टीका होत असतानाच आता फॉरवर्डने भूमिका बदलल्याचे दिसत आहे.

आप मात्र वेगळाच:

'आप'ने अद्याप काँग्रेससोबत जाण्याची भूमिका घेतलेली नाही. पक्षाचे अध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत काँग्रेसवर टीका केली. सरदेसाई यांनी मात्र काँग्रेसवर टीका करणे जनतेला पसंत नसल्याचे सांगत 'आप'पासून अंतर राखले आहे.

'आप'चे नवे होर्डिंग्स:

भाजप आणि काँग्रेसमध्ये दोस्ती असून निवडणुकीनंतर काँग्रेसचे आमदार पुन्हा फुटतील. त्यामुळे तिसऱ्यांदा फसवणूक होऊ देऊ नका, अशा आशयाची नवी होर्डिंग्स 'आप'ने लावली आहेत. 'आम्ही गोव्याच्या जनतेसोबत आहोत; भाजप-काँग्रेसच्या जॉइंट व्हेंचरसोबत नाही', असा संदेश त्यातून देण्यात आला आहे.

सर्व विरोधक एक व्हावेत : सरदेसाई:

भाजपविरोधात लढण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन 'ग्रँड अलायन्स' करावी, अशी गोमंतकीयांची इच्छा आहे. त्यासाठीच गोवा फॉरवर्ड आणि 'आप'ची गोवाभरातील होर्डिंग्स काढण्यात आली. प्रमुख विरोधी पक्षाला लक्ष्य करण्यात अर्थ नाही, अशी भूमिका आमदार विजय सरदेसाई यांनी मांडली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT