विजय सरदेसाई Pudhari File Photo
गोवा

Govind Gawade Case : हटविण्याचे कारण स्पष्ट करा : सरदेसाई

पुढारी वृत्तसेवा

मडगाव : भ्रष्टाचाराला समर्थन देणार्‍याला भाजप सरकार अभय देत असून भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणार्‍यांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवत आहे, असा समज लोकांमध्ये पसरू लागला आहे. सरकारच्या या कृतीमुळे गोव्याचे नाव बदनाम होत आहे. ही बदनामी टाळण्यासाठी कला आणि संस्कृती खात्याच्या मंत्रिपदावरून गोविंद गावडे यांना का हटवले याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी द्यावे, अशी मागणी आमदार विजय सरदेसाई यांनी केली आहे.

ते म्हणाले, भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवणार्‍या मंत्र्यांना डच्चू दिला जातो, हे दुर्दैवी आहे. ज्यावेळी कला अकादमीतील भ्रष्टाचाराविषयी तत्कालीन मंत्री गोविंद गावडे यांच्या विरोधात आवाज उठवला होता व उच्च न्यायालयापर्यंत हा विषय नेला होता, त्यावेळी सरकार त्यांच्या पाठीशी उभे राहिले होते. मात्र, ज्यावेळी गावडे स्वतः सरकारातील भ्रष्टाचाराबद्दल बोलले त्यावेळी त्यांच्यावर कारवाई केली गेली. भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणार्‍यावर भाजप सरकारकडून कारवाई केली जाते आणि भ्रष्टाचाराला पाठिंबा देणार्‍याला सरकार अभय देते हे स्पष्ट झाल्याचेही ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांकडे डझनभर खाती...

कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आल्यामुळे त्यांच्याकडे असलेली तीन खाती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे आलेली आहेत. त्यामुळे त्यांच्याकडील मुख्य खात्यांची संख्या 12 झाली आहे. मुख्यमंत्र्यांकडे पूर्वीच गृह, खाण, अर्थ, कार्मिक, शिक्षण, दक्षता, राजभाषा, आदिवासी कल्याण व सार्वजनिक बांधकाम खाते ही 9 महत्त्वाची खाती होती. त्यात आता गावडे यांच्याकडील कला व संस्कृती, क्रीडा आणि ग्रामीण विकास ही तीन खाती मुख्यमंत्री सावंत यांच्याकडे आली आहेत. त्याचबरोबर गोवा पायाभूत सुविधा विकास महामंडळ व आर्थिक विकास महामंडळाचेही ते अध्यक्ष आहेत.

मनोज परब यापूर्वीच कारवाई आवश्यक होते

गोविंद गावडे यांना मंत्रिपदाच्या काळात भोम भागातील नागरिकांच्या समस्या दिसल्या नाहीत. रस्ता रुंदीकरणाच्याविरोधात भोममधील नागरिक रस्त्यावर उतरले असताना गावडे यांनी त्यांना साथ दिली नाही. त्यामुळे त्यांचे मंत्रिपदही गेले आहे. खरे तर त्यांचे मंत्रिपद कला अकादमीच्या प्रकरणी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते त्यावेळी काढून घेणे गरजेचे होते. मुख्यमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर त्यांनी गोविंद गावडे यांचे मंत्रिपद काढून घेतले, अशी प्रतिक्रिया रिव्होल्युशनरी गोवन्स (आरजी) पक्षाचे अध्यक्ष मनोज परब यांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT