पणजी : पुढारी वृत्तसेवा
मुख्यमंत्री आणि भाजपच्या मंत्र्यांनी एसटी आरक्षणाच्या समर्थनार्थ केलेली वक्तव्ये आणि उच्च न्यायालयातील सरकारची भूमिका यामध्ये विसंगती असल्याचा आरोप गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई यांनी केला. सरकारच्या भूमिकेमुळेच एसटी लोकसंख्येचा अंदाज निश्चित करण्यासाठी जारी होणाऱ्या अधिसूचनाला स्थगिती मिळाली असल्याचे सांगत त्यांनी सरकारकडून या विषयावर स्पष्टता आणि जबाबदारीची अपेक्षा व्यक्त केली.
गोव्यातील अनुसूचित जमातींच्या (एसटी) अंदाज लोकसंख्येबाबत अधिसूचना जारी करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने अंतरिम स्थगिती दिल्याने विधानसभा राजकारणातील आरक्षणाच्या दीर्घकाळ प्रलंबित मागणीला आणखी एक धक्का बसल्याची टीका त्यांनी केली.
सरदेसाई यांनी या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सार्वजनिक व्यासपीठावर सरकारकडून एसटी आरक्षणाला पाठिंबा दर्शवला जात असताना प्रत्यक्षात ही प्रक्रिया न्यायालयीन अडचणीत सापडल्याने गोव्याचे मूळ रहिवासी असलेल्या 'मूळ गोमंतकीयांच्या' अपेक्षांचा पुन्हा एकदा भंग झाला असल्याचे त्यांनी म्हटले.