Nana Patekar Pudhari
गोवा

Nana Patekar Passes Away | नटसम्राट नाना पाटेकर काळाच्या पडद्याआड; गोव्यात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

Nana Patekar Passes Away | मी आज आहे, उद्या नाही. उद्या कोण काय घेऊन जाईल, हे माहीत नाही. असेल तोवर चांगले काम करून जावे, हे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गोव्यातील शब्द अखेरचे ठरले.

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

मी आज आहे, उद्या नाही. उद्या कोण काय घेऊन जाईल, हे माहीत नाही. असेल तोवर चांगले काम करून जावे, हे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गोव्यातील शब्द अखेरचे ठरले. गुरुवारी (दि.८) पहाटे साडेपाचच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटका्याने त्यांचे दोनापावल येथील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. आवश्यक सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर मृतदेह फुलांनी सजवलेल्या रुग्णवाहिकेतून मोप मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत नेण्यात आला. तेथून खासगी विमानाने पुण्याला नेण्यात आला.

सम्राट क्लब आंतरराष्ट्रीय च्या शनिवारी (दि.४) झालेल्या पदग्रहण सोहळ्यात सहभागी होण्यासाठी अभिनेते नाना पाटेकर शनिवारी (दि. ३) गोव्यात दाखल झाले होते. त्यानंतर ते येथील आपल्या खासगी फ्लॅटमध्ये वास्तव्याला होते. बुधवारी मध्यरात्री अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांच्या केअर टेकरने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले.

तिथे सुमारे पंचेचाळीस मिनिटे सीपीआर देण्यात आला. मात्र, ते अपयशी ठरले. अखेर सकाळी ५.३० वा. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर मृतदेह बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळाच्या सभागृहात पाठवून देण्यात आला.

दुपारी दीडच्या सुमारास नाना पाटेकर यांचा मुलगा मल्हार आणि पत्नी नीलकांती दाखल झाले, त्यानंतर शवविच्छेदन प्रक्रिया सुरू करण्यात आली. मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्यानंतर पुण्याला नेण्याआधी काही मिनिटे सभागृहात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला होता. यावेळी गोवा सरकारच्या वतीने सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत, कला आणि संस्कृती मंत्री रमेश तवडकर यांनी, तर महाराष्ट्र सरकारच्या वतीने उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहिली. तसेच गोव्याचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनीही श्रद्धांजली अर्पण केली.

दरम्यान, सकाळी मृतदेह गोमेकॉतील सभागृहात आणण्यात आल्यानंतर अभिनेते सयाजी शिंदे, नाना पाटेकर यांचा पुतण्या प्रसाद पाटेकर दाखल झाले, त्यानंतर गोवा प्रदेश काँग्रेसचे माजी माणिकराव ठाकरे, अभिनेते विजय केंकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, सम्राट क्लब आंतरराष्ट्रीय चे माजी राज्य अध्यक्ष शशिकांत पुनाजी, सम्राट क्लबच्या राज्य अध्यक्ष राजश्री खांडेपारकर, अध्यक्ष अक्षय खांडेपारकर यांनीही अंत्यदर्शन घेतले.

केअर टेकरची धडपड..

नाना पाटेकर यांना अस्वस्थ वाटू लागल्याची माहिती मिळताच त्यांच्या केअर टेकरने तातडीने त्यांना दोनापावल येथील खासगी इस्पितळात नेले. नाना पाटेकर यांनी मध्यरात्री २.३० वाजण्याच्या सुमारास एका मित्राला मेसेज करून आपल्याला अस्वस्थ वाटत असल्याची माहिती दिली होती. हृदय विकाराचा झटका आल्यानंतर पहिला तास हा 'गोल्डन अवर' मानला जातो. त्यांनी मेसेज पाहिला असता तर कदाचित त्यांना योग्य वेळी उपचार मिळू शकले असते. मात्र, केअर टेकरला माहिती मिळताच त्यांनी शक्य ती धडपड केली. मात्र ती दुर्दैवाने अपयशी ठरली.

सांस्कृतिक क्षेत्राची हानी : मंत्री उदय सामंत

नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी गोमेकॉमध्ये दाखल झालेले महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले की, नाना पाटेकर यांनी मराठी रंगभूमीबरोबरच मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजवली. त्यांच्या निधनाने सांस्कृतिक क्षेत्राची न भरून येणारी हानी झाली आहे. राजकारण, समाजकारण या विषयी ते मार्गदर्शन करायचे. त्यांनी नाम फाउंडेशनच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील काही नद्यांतील गाळ काढला. मराठवाड्याबरोबरच दुष्काळात भागाला मदत कशी करायची हे त्यांनी कर्तृत्वाने सिद्ध केले.

५.३० वाजता मृत घोषित : डॉ. साळकर

अभिनेते नाना पाटेकर यांना बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी सुमारे ४५ मिनिटे ते एक तास कार्डियाक मसाज दिला, त्यांना वाचवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले. मात्र, पहाटे ५.३० च्या सुमारास त्यांना मृत घोषित करण्यात आले, अशी माहिती त्यांना दाखल केलेल्या खासगी रुग्णालयाचे डॉ. शेखर साळकर यांनी दिली.

त्यांना बघतच पुढे आलो : सयाजी शिंदे

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी कळताच अभिनेते सयाजी शिंदे बांबोळी येथे गोमेकॉमध्ये अंत्यदर्शनासाठी सकाळीच दाखल झाले होते. यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले की, काही घटना अशा असतात की, त्यांची उत्तरे आपल्याकडे नसतात. त्यांच्याशी महिन्यापूर्वी बोलणे झाले होते. खरं तर मी त्यांच्या घरी जेवणासाठी जाणार होतो. असा अभिनेता पुन्हा पुन्हा होत नाही. त्यांनी इतक्या विविध भूमिका केल्या आहेत. आम्ही त्यांना बघत बघतच पुढे आलो.

त्रिसदस्यीय वैद्यकीय पथकामार्फत शव विच्छेदन

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचा मृत्यू एका खासगी इस्पितळात उपचारासाठी आणण्यापूर्वीच झाल्याने पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यासाठी तीन सदस्यीय वैद्यकीय पथक स्थापन करण्यात आले होते. या पथकाने सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये शवविच्छेदन केले.

स्वत:च्या अटींवर काम : विजय केंकरे

ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे म्हणाले की, नाना पाटेकर यांच्याशी १९७० पासून ओळख आहे. कलावंतांनी समाजासाठी योगदान दिले पाहिजे याची जाणीव असलेला हा कलाकार, जिथे गेले तिथे स्वतःच्या अटींवर काम केले. त्यांना मित्रांना जेवण करून वाढायला आवडत असे. त्यांच्या निधनाने रंगभूमीचा बापमाणूस गेला. मात्र, त्यांच्या सोबत कमी काम करण्याची संधी मिळाली नाही.

चित्रपटसृष्टीतील प्रभावी पर्व संपले : शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) नेते शरद पवार खासगी गोव्यात भेटीवर आले होते. अभिनेते नाना पाटेकर यांचे गोव्यात निधन झाल्याचे वृत्त समजताच त्यांनी गोमेकॉला भेट देत पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाची दुखद बातमी अत्यंत क्लेशदायक आहे. त्यांच्या जाण्याने भारतीय चित्रपटसृष्टीतील एक असाधारण, संवेदनशील आणि प्रभावी पर्व आज संपले आहे.

आपल्या दमदार अभिनयाने, आगळ्यावेगळ्या संवादफेकीने त्यांनी प्रत्येक भूमिकेत सहजतेने त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर कायमचा ठसा उमटवला. अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांना त्यांच्या अभिनयाचे विविध पैलू अनुभवायला मिळाले. एक कलाकार म्हणून यशस्वी असतानाच, सामाजिक भानही असलेली त्यांची नाळ आणि 'नाम फाउंडेशन'च्या माध्यमातून त्यांनी केलेले सक्रिय समाजकार्य हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा तितकाच प्रेरणादायी पैलू होता. त्यांच्या अभिनयाचा, विचारांचा आणि समाजकार्याचा ठसा कायम स्मरणात राहील.

"ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाचे वृत्त ऐकून धक्का बसला आणि तीव्र दुःख झाले. रंगभूमी, हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या उल्लेखनीय प्रवासाने, दमदार अभिनयाने आणि वैशिष्ट्यपूर्ण कलात्मकतेने भारतीय चित्रपटसृष्टीवर अमित छाप सोडली आहे. त्यांच्या कुटुंबीयांना, मित्रांना, चाहत्यांना आणि संपूर्ण चित्रपटसृष्टीला मनःपूर्वक संवेदना. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो."
— डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT