पणजी : पुढारी वृत्तसेवा
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्वयंपूर्ण गोवा उपक्रमाच्या माध्यमातून राज्यात भाजी उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी राबवलेल्या विविध योजनांचा परिणाम आता दिसत आहे. एप्रिल ते ऑगस्ट या चार महिन्यांच्या काळात गोवा फलोत्पादन महामंडळाने स्थानिक भाजी उत्पादकांकडून तब्बल 3 कोटी 20 लाख रुपयांची 7 लाख किलो भाजी खरेदी केली. यावरून राज्यात भाजीचे उत्पादन वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्याला दूध, फुले, फळे आणि भाजी यासाठी शेजारील राज्यांवर अवलंबून राहावे लागते. निदान भाजी व दुधाचे उत्पादन राज्यात वाढावे यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्वयंपूर्ण गोवा उपक्रमातून जागृती केली. अधिकार्यांना पंचायतीत नेऊन शेतकर्यांना येणार्या अडचणी सोडवल्या. त्यामुळे मागील दोन वर्षात हळू हळू भाजीचे उत्पादन वाढू लागले आहे. गेल्या चार महिन्यांतील भाजी खरेदीवरून मुख्यमंत्र्यांचा स्वयंपूर्ण गोवा उपक्रम यशस्वी झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
गोवा फलोत्पादन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक चंद्रहास देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल ते ऑगस्ट चार महिन्यांच्या काळात महामंडळाने स्थानिक भाजी उत्पादक शेतकर्यांकडून तब्बल 3 कोटी 20 लाख रुपयांची 7 लाख किलो भाजी खरेदी केली. राज्याच्या विविध भागातील 290 शेतकर्यांकडून 21 प्रकारची भाजी खरेदी करण्यात आली. वरील काळात एकूण 7 लाख 1 हजार 976 किलो भाजीचे उत्पादन झाले. फलोत्पादन महामंडळाने 3 कोटी 20 लाख 51 हजार 136 रुपये देऊन ती खरेदी केली. सर्वाधिक जास्त खरेदी 3.25 लाख किलो भेंडी केली. काकडी 1.33 लाख किलो खरेदी करण्यात आली. त्यासाठी अनुक्रमे 1.69 कोटी आणि 1.33 लाख रुपये खर्च करण्यात आले. राज्यात स्थानिक भाजीला मोठी मागणी आहे. त्यामुळे उत्पादक स्वतः रस्त्याकडेला बसून मोठ्या प्रमाणात भाजी विकतात असेही देसाई यांनी सांगितले.
अन्य भाज्यांमध्ये 59,168 किलो चिटकी (किंमत 46.06 लाख रुपये), 58,941 किलो हिरवी मिरची (39.38 लाख रुपये), 45,253 किलो कोकणी दुधी (14.6 लाख रुपये), 19,486 किलो वांगी (5.91 लाख रुपये), 6,663 किलो तेंडली (2.79 लाख रुपये), 4,278 किलो कोबी (1.17 लाख रुपये), 3,452 किलो तांबडी दुधी (97,928 रुपये), 1,050 किलो वाल (57,194 रुपये), 1,219 किलो घोसाळी (55,077 रुपये), 1,127 किलो टोमॅटो (32,678 रुपये), 688 किलो कारली (37,691 रुपये) आणि 11,779 किलो लिंबू (40,905 रुपये) खरेदी करण्यात आले.