वास्को : पुढारी वृत्तसेवा
सांकवाळ जिल्हा पंचायत मतदारसंघातून अपेक्षप्रमाणे भाजपाचे सुनील गावस तर कुठ्ठाळी जिल्हा पंचायत मतदार संघातून अपक्ष उमेदवार मर्सियना वास हे विजयी झालेत. गत पंचायत जिल्हा पंचायत निवडणुकीत सांकवाळ मतदार संघातून अनिता थोरात बिनविरोध निवडून आल्या होत्या. यंदा सुनील गावस हे १९०२ मताधिक्यांनी निवडून आले आहेत. कुठ्ठाळीच्या २०२२ च्या पोटनिवडणुकीत मर्सियना वास सुमारे ३० हजार मताधिक्याने निवडून आल्या होत्या. या निवडणुकीत त्यांचे मताधिक्य १८५८ वर आले. सुनील गावस यांच्या विजयाबद्दल मंत्री मावीन गुदिन्हो यांनी ही विकासकामांची पावती असल्याचे सांगितले. तर कुठ्ठाळीचे आमदार आंतोन वास यांनीही विकासकामामुळे हा विजय मिळाल्याचे स्पष्ट केले. पंचायत सांकवाळ जिल्हा मतदारसंघातून सुनील गावस (भाजप), वसंत नाईक (काँग्रेस), आलेख नाईक (आप), अच्युत नाईक, गिल्बर्ट मारियनो रॉड्रिग्ज, कालिदास वायंगणकर, शिवानंद नागवेकर, राजेश शेट्टी (सर्व अपक्ष) असे आठ उमेदवार होते. यामध्ये सुनील गावस व मारियनो रॉड्रिग्ज यांच्यामध्ये लढत झाली. सुनील गावस यांना ६११०, तर मारियनो रॉड्रिग्ज यांना ४८०८ मते मिळाली. काँग्रेसचे वसंत नाईक यांना तिसऱ्या क्रमांकाची ३०६५ मते मिळाली. भाजपला सोडचिठ्ठी देऊन निवडणूक लढविणारे अच्च्युत नाईक यांनीही दखल घेण्याएवढी म्हणजे २०७८ तसेच राजेश शेट्टी यांनीही ११६१ मते मिळविली. सुनील गावस यांना चिखली पंचायतीमधून २८१९ मते तर वसंत नाईक १३७१ मते मिळालीत. चिखली पंचायतीतून सरपंच कमलाप्रसाद यादव यांनी मोठी मेहनत घेतली होती. कुठ्ठाळीतून आमदार वास यांच्या पत्नी मर्सियना वाझ विजयी झाल्या. त्यांच्यासमोर काँग्रेसच्या सँड्रा रॉड्रिग्ज यांचे आव्हान होते. येथून आरजीनेही अँजेलिन टेलीस यांना उमेदवारी दिली होती. मर्सियना वाझ यांना ५२२४ तर सैंड्रा रॉड्रिग्ज यां ३३६६ मते मिळालीत. अँजेलिन टेलिस यांना १२५० मते मिळालीत. दोन फेरीच्या मतमोजणीत मर्सियना वाझ यांनी दोन्ही ठिकाणी आघाडी घेतली होती. सुनील गावस यांच्या विजयानंतर मंत्री गुदिन्हो यांनी विजयाचा हा वेग विधानसभा निवडणुकीपर्यंत असाच राहील, असे सांगितले. आमदार वास यांनी मर्सियना वास यांच्या विजयामुळे मोठी शक्ती मिळाली असल्याचे सांगितले. माझ्यावर काही आरोप करण्यात आले होते. त्या सर्व आरोपांना मी २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत उत्तरे देणार आहे. निरनिराळे सरपंच, पंच व मतदारांच्या पाठिंबावर हा विजय प्राप्त झाला आहे.