डिचोली : कोळशेकातर कारापूर येथे विजेचा झटका लागून संशयास्पदरित्या मृत पावलेल्या वासंती सालेलकर यांच्या मृतदेहावरील एका डॉक्टरांकडून न होता डॉक्टरांच्या पॅनलमार्फत व्हावी, अशी मागणी तिचे नातेवाईक व समाजसेवकांकडून करण्यात आल्यानंतर गुरूवारी दि. 4 डिसेंबर रोजी डॉक्टरांच्या पॅनलमार्फत तिच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्या तपसणीचा अहवाल प्राप्त झाला असून विजेचा शॉक लागूनच मृत्यू झाल्याचे शव चिकित्सा अहवालात स्पष्ट करण्यात आल्याची माहिती डिचोली पोलिसांनी दिली.
गोमेकॉचे डीन यांनी तीन तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत शव विच्छेदन नंतर या बाबतचा अहवाल दिला, अशी माहिती निरीक्षक विजय राणे यांनी दिली. तसेच त्या नंतर वासंती सालेलकर हिचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, सायंकाळी अंतिम संस्कार करण्यात आले. या प्रकरणी डिचोली पोलिसांनी कसून चौकशीला हाती घेतली असून सर्व माध्यमातून प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत आहे, असे पोलिस उपाधीक्षक श्रीदेवी यांनी स्पष्ट केले होते.
कोळशेकातर कारापूर येथे एका न्यायप्रविष्ठ असलेल्या मालमत्तेत घरात राहणाऱ्या वासंती सालेलकर या अविवाहित महिलेचा घरातील लोखंडी पत्राच्या दाराला विजेचा झटका आल्याने मृत्यू झाला होता. या मालमत्ते बाबत न्यायालयीन लढा सुरू होता. हा लढा सुरू असतानाच हे प्रकरण झाल्याने यामध्ये घातपात असल्याचा दावा वासंती सालेलकर यांच्या घरच्यांनी व समाजसेवी लोकांनी केला होता. त्या अनुषंगाने याची रीतसर चौकशी तसेच वैद्यकीय अहवाल सादर करण्याची मागणी करण्यात आली होती.
मालमत्तेवरील लढ्यात वासंती सालेलकर यांचा मोठा संघर्ष सुरू होता. या संघर्षात दोन-तीन वेळा त्यांच्यावर जीवघेणा हल्लाही झाला होता. तसेच त्या पाणी वापरत असलेल्या विहिरीत एकदा विषही घालून त्यांच्यावर विषप्रयोग करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, अशी माहिती देण्यात आली होती. त्यातूनही सावध होताना त्यांनी नंतर सदर विहिरीचे पाणीच वापरणे बंद करून जवळील घरांकडून पाणी आणून त्या वापरत होत्या. न्यायालयात या मालमत्ते संदर्भात सुरू असलेल्या खटल्यात त्यांनी नुकत्याच एक नवीन वकील नेमला होता व त्या प्रकरणाची सुनावणी 10 डिसेंबर रोजी होणार होती.