सावईवेरे : फोंडा महालातील वळवई येथे १९२० साली संस्थापित ललितप्रभा नाट्यमंडळाचा शतकोत्तर १०५ व्या वर्षपूर्ती निमित्त वळवईच्या नाट्यपरंपरेला मानवंदना देणारा नाट्य महोत्सव २३, २४ व २५ जानेवारी रोजी वळवई येथे श्री गजांतलक्ष्मी सभागृहात होणार आहे.
तारी सोसायटी, वळवई, पंचायत वळवई व सिद्धार्थ ज्ञानपीठ वळवई या संस्थांचा पारंपारिक सहभाग या कार्यक्रमाला लाभला आहे, अशी माहिती आयोजन समितीचे अध्यक्ष किसन फडते यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. या पत्रकार परिषदेत विठ्ठल सावंत, राजेंद्र वळवईकर, गोविंद तारी आणि शांता संजय शेट उपस्थित होते. या नाट्यमहोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी २३ रोजी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाला नाट्यसिने अभिनेत्री वर्षा उसगावकर उपस्थित राहतील. आमदार गोविंद गावडे, बेतकी खांडोळा जिल्हा पंचायत सदस्य सुनील भोमकर, वळवई ग्रामपंचायतीचे सरपंच विनायक वेंगुर्लेकर, तारी सोसायटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर तारी, ज्येष्ठ पत्रकार नरेंद्र तारी, संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल सावंत हे उपस्थित राहतील. सदर कार्यक्रमात ललितप्रभा संगीत मंडळीचे संस्थापकीय सदस्य व कलाकार विद्यमान पंच्याहत्तर वर्षावरील संस्थेचे कलाकार व ललित प्रभा संगीत मंडळाचे १९७२ साली ललित प्रभा नाट्यमंडळ नामांकन करणारे व संस्थेला सरकार मान्यता मिळवून देणारे कार्यकारी मंडळ सदस्यांचा हस्ते सत्कार होणार आहे.
त्याचबरोबर संस्थेने १०५ व्या वर्षात आयोजित केलेल्या मास्टर दत्ताराम एकपात्री अभिनय स्पर्धेतील यशस्वी कलाकारांना बक्षिसे देण्यात येणार आहेत. शुक्रवारी २३ रोजी काळोख देत हुंकार हे नाटक होणार आहे. २४ रोजी संगीत ययाती, देवयानी नाटक सायं. ७वा. होईल. दि. २५ रोजी संध्याकाळी ४ वा. नाट्य महोत्सवाचा समारोप सोहळा केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, कला व संस्कृती मंत्री रमेश तवडकर, प्रियोळचे आमदार गोविंद गावडे, तारी सोसायटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर तारी, सरपंच विनायक वेंगुर्लेकर, संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल सावंत आदींच्या उपस्थितीत होणार आहे. समारोप सोहळ्यानंतर 'बायको पाहिजे नखरेवाली' हा नाट्यप्रयोग होणार आहे.