वाळपई : सरकारने माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांना बढती देऊन त्यांची उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये नियुक्ती केल्याच्या निर्णयाचे पडसाद उमटू लागले आहेत. पूर्वी तासिका पद्धतीवर कार्यरत शिक्षकांना अचानकपणे बाजूला करून त्यांच्या जागी नवीन शिक्षकांची नियुक्ती केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर परिणाम होत असल्याचा आरोप करत वाळपई सरकारी उच्च माध्यामिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शुक्रवारी वर्गावर बहिष्कार घालून निषेध व्यक्त केला.
सकाळी ८ पासून दुपारी २ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांनी वर्गात जाण्यास नकार दिला, परीक्षांना काही काळच शिल्लक असताना शिक्षक बदलल्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण होण्यास तसेच अध्यापनाच्या सातत्याला अडथळा निर्माण होत असल्याचा मुद्दा विद्याथ्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, यापूर्वी पेडणे येथील उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनीही याच प्रश्नावर वर्गावर बहिष्कार घातला असून गेल्या दोन दिवसांपासून त्यांचे आंदोलन सुरू असल्याचे समोर आले आहे. हा प्रश्न आता केवळ एका विद्यालयापुरता मर्यादित न राहता राज्यातील शैक्षणिक क्षेत्रात चर्चेचा विषय ठरला आहे.
विद्याथ्र्यानी दिलेल्या माहितीनुसार, सरकारने पूर्वीपासून तासिका पद्धतीवर अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना अचानकपणे घरी पाठवून त्यांच्या जागी नवीन शिक्षकांची नियुक्ती केली आहे. नवीन शिक्षकांची नियुक्ती करण्यात आल्याबद्दल विद्याथ्यांना आक्षेप नसून, अचानकपणे अध्यापन व्यवस्था बदलल्यामुळे निर्माण झालेल्या शैक्षणिक अडचणींवर विद्यार्थ्यांचा मुख्य आक्षेप आहे.
वाळपई सरकारी उच्च माध्यामिक विद्यालयात गेल्या अनेक वर्षांपासून तासिका पद्धतीवर कार्यरत असलेल्या शिक्षकांशी विद्यार्थ्यांचे भावनिक नाते निर्माण झाले होते. या शिक्षकांकडून विद्याथ्यांना सातत्याने आणि चांगल्या पद्धतीने अध्यापन करण्यात येत होते. मात्र, अचानकपणे त्यांना हटविण्यात आल्याने विद्यार्थ्यांना नव्या शिक्षकांशी जुळवून घेण्यास अडचणी येत असल्याचा दावा विद्याथ्यांनी केला आहे. नवीन शिक्षकांना अपेक्षेप्रमाणे शिकविता येत नाहीं' असा थेट आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
विद्यार्थ्यांनी सांगितले की, गेल्या काही महिन्यांपासून पूर्वीचे शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत होते. त्यांच्या अध्यापन पद्धतीशी विद्यार्थी परिचित झाले होते. अभ्यासक्रमातील महत्त्वाचे भाग, परीक्षा पद्धती, प्रश्नपत्रिकेचा आराखडा आणि पुनरावृत्ती याबाबतही त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळत होते. अशा परिस्थितीत अचानक शिक्षक बदलल्याने 'आता परीक्षेला आम्ही कशा प्रकारे सामोरे जायचे?' असा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.
विद्यार्थ्यांनी प्राचार्य लक्ष्मी सुखटणकर यांच्याशी चर्चा केली. आंदोलनाची आणि त्यांच्या मागण्यांची संपूर्ण माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे प्राचार्यानी सांगितले.
पूर्वीचे शिक्षक अध्यापनासाठी उपलब्ध करून द्या
पूर्वीचे शिक्षक पुन्हा विद्यालयात अध्यापनासाठी उपलब्ध करून देण्यात यावेत, अशी विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी आहे. सरकारकडून या संदर्भात ठोस निर्णय होत नाही; तोपर्यंत वर्गावर बहिष्कार सुरूच ठेवण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला. सरकारने या प्रश्नाकडे गांभीयनि पाहावे आणि शिक्षकांच्या नियुक्तीचा निर्णय घेताना विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.