वाळपई (पुढारी वृत्तसेवा):
राज्याच्या विविध भागांत चोरी, मारामारी, हाणामारी तसेच अन्य गुन्हेगारी घटनांमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे महत्त्व अधोरेखित होत असताना, सत्तरी तालुक्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या वाळपई शहरात मात्र अद्याप सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सुविधा उपलब्ध झालेली नाही. गेल्या अनेक वर्षांपासून या सुविधेची मागणी होत असून, जवळपास दहा वर्षांपूर्वी वाळपई शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी प्रस्तावही तयार करण्यात आला होता.
मात्र, अद्याप या प्रस्तावाला मंजुरी मिळालेली नसल्याने शहराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सत्तरी तालुक्याचे प्रमुख प्रशासकीय आणि व्यापारी केंद्र म्हणून वाळपई शहराची ओळख आहे. शहरात अनेक सरकारी कार्यालये, पोलीस स्थानक, शाळा, महाविद्यालये, व्यापारी आस्थापने आणि विविध सार्वजनिक सुविधा आहेत.
तालुक्यातील ग्रामीण भागांतून नागरिक विविध कामांसाठी दररोज वाळपईत येत असतात. त्याचप्रमाणे हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी शहरात ये-जा करतात. त्यामुळे नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे अत्यंत आवश्यक बनले आहे.
वाळपई शहरातून सत्तरी तालुक्यातील विविध ग्रामीण भागांना जोडणारे रस्ते जातात. त्यामुळे शहरात प्रवेश करणाऱ्या आणि बाहेर पडणाऱ्या प्रमुख मार्गांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे महत्त्वाचे ठरणार आहे. तालुक्यातील एखाद्या गावात चोरी, मारामारी किंवा अन्य गंभीर घटना घडल्यानंतर संशयित व्यक्ती वाळपईमार्गे दुसरीकडे जाण्याची शक्यता असते.
त्यामुळे गुन्ह्यांच्या तपासाला मदत होण्याबरोबरच गुन्हेगारी कृत्यांना प्रतिबंध घालणेही शक्य होणार आहे. जवळपास दहा वर्षांपूर्वी उत्तर गोव्याचे खासदार तथा केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडे वाळपई नगरपालिकेच्या वतीने शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासंदर्भातील प्रस्ताव सादर करण्यात आला होता, अशी माहिती मिळाली आहे. या प्रस्तावाच्या अनुषंगाने आवश्यक सर्वेक्षणही करण्यात आले होते.
सध्या वाळपई नगरपालिकेचा कारभार प्रशासकांच्या माध्यमातून चालवला जात असून लोकनियुक्त मंडळ अस्तित्वात नाही. त्यामुळे या विषयाचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी विद्यमान प्रशासकीय यंत्रणेवरही आहे. नगरपालिकेने यापूर्वी सादर केलेल्या प्रस्तावाची सद्यस्थिती तपासून तो पुन्हा शासनदरबारी मांडावा आणि आवश्यक निधी उपलब्ध करून घेण्यासाठी प्रयत्न करावेत,
अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. विशेषतः आरोग्यमंत्री तथा स्थानिक आमदार विश्वजित राणे यांनी या विषयाकडे प्राधान्याने लक्ष देऊन वाळपई शहरात आधुनिक सीसीटीव्ही कॅमेरा यंत्रणा उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.