पणजी : पुढारी वृत्तसेवा
पणजीतील पाटो परिसरात अनेक शासकीय तसेच महत्त्वाची कार्यालये आहेत. तिथे लागूनच पणजी बसस्थानक असल्यामुळे या भागात नागरिकांची आणि पादचाऱ्यांची मोठी वर्दळ असते. मात्र, पाटोवरील पादचाऱ्यांच्या सोयीसाठी असलेल्या पदपथावर बेकादापणे दुचाकी पार्क केल्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
दरम्यान, या परिसरात विविध ऑफिसेसमध्ये कामाला जाणारे कर्मचारी, विद्यार्थी, प्रवासी तसेच जेष्ठ नागरिकांची गर्दी असते. शासकीय कार्यालयांच्या इमारतींना लागूनच असलेले पदपथ नागरिकांना येण्या जाण्यासाठी एकमेव मार्ग आहेत. मात्र, या फुटपाथवर बहुतांश दुचाकी पार्क केल्यामुळे पदपथ नेमका कुणासाठी? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
पार्किंग शुल्क वाचवण्यासाठी का? सदर परिसरामध्ये पणजी महानगरपालिकेतर्फे पे-पार्किंगची सुविधा करण्यात आली आहे. मात्र, पार्किंगचे पैसे वाचवण्याच्या नादात अनेक दुचाकी चालक हे तिथे असलेल्या पदपथावर आपली वाहने पार्क करत असल्याचे निदर्शनास आले. याबाबत प्रशासनाने लक्ष घालून अशा वाहन चालकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
पणजी बस स्थानकावर उतरून मध्यवर्ती ग्रंथालयात जाताना पदपथ हा आमच्यासाठी एकमेव मार्ग आहे. मात्र, तिथे अनेकदा वाहने पार्क केल्यामुळे रस्त्यावरूनच चालत जावे लागते. मात्र, रस्त्यावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते अशावेळी अपघात घडलाच त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न काहीजण उपस्थित करत आहेत.
पदपथावर पार्किंग करणे चुकीची बाब आहे. एखादा अपघात घडलाच त्याला जबाबदार कोण? हे सर्व लक्षात घेता प्रशासनाने या बेकायदेशीर पार्किंगवर त्वरित कारवाई करण्यात यावी.दीपिका बोरकर, विद्यार्थिनी,