Gram Sabha 2026  
गोवा

Gram Sabha Goa | उसगावात 39-अ अंतर्गत भू-रूपांतराला विरोध

Usgao Gram Sabha Goa | ग्रामसभेत एकमताने ठराव; नैसर्गिक क्षेत्रांचे संरक्षण करण्याचीही मागणी

पुढारी वृत्तसेवा

उसगाव : पुढारी वृत्तसेवा

उसगाव ग्रामसभेत नगरनियोजन कायद्यातील वादग्रस्त कलम ३९-अ अंतर्गत होणाऱ्या भू-रूपांतराला तीव्र विरोध दर्शवत एकमताने ठराव मंजूर करण्यात आला. गावाचे अस्तित्व, पर्यावरण आणि नियोजनबद्ध विकास जपण्यासाठी पंचायत क्षेत्रात कलम ३९-अ तसेच तत्सम तरतुदींअंतर्गत येणारे अर्ज स्वीकारू नयेत आणि अशा कोणत्याही प्रस्तावाला पंचायतने अधिकृत विरोध करावा, अशी भूमिका ग्रामस्थांनी मांडली.

गावातील तळे, नाले व नैसर्गिक क्षेत्रांचे संरक्षण करण्याची गरजही ग्रामसभेत अधोरेखित करण्यात आली. उसगाव पंचायतीच्या नव्या सभागृहात झालेल्या ग्रामसभेला सरपंच राजेंद्र नाईक, उपसरपंच संगीता डोईफोडे, पंच सदस्य विनोद मास्कारेन्हास, वैभवी गावडे, रेश्मा मटकर, पंचायत सचिव मयूर कुडाळकर तसेच फोंडा गट विकास अधिकारी कार्यालयातील ग्रामसेवक पद्मिनी शिरोडकर उपस्थित होत्या.

ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्याच्या समस्येकडे लक्ष वेधले. गांजे येथील नवीन पाणी शुद्धीकरण प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर उसगावची पाणीटंचाई कायमस्वरूपी दूर होईल. सध्या प्रायोगिक तत्त्वावर सुरू असलेल्या पुरवठ्यामुळे काही भागांना दिलासा मिळाल्याची माहिती सरपंच राजेंद्र नाईक यांनी दिली.

मागील तीन महिन्यांत पंचायतच्या कचरा प्रकल्पालाही पाणीटंचाईचा सामना करावा लागल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक युवकांना उसगावातील औद्योगिक आस्थापनांत रोजगाराला प्राधान्य मिळावे, यासाठी उद्योग प्रतिनिधी, पंचायत मंडळ व ग्रामस्थांची संयुक्त बैठक बोलावण्याची मागणी करण्यात आली.

ग्रामसभेला कमी उपस्थितीबाबतही चर्चा झाली. ग्रामस्थांमध्ये जनजागृती पूर्वीप्रमाणेच केली जात असल्याचे पंचायत सचिव मयूर कुडाळकर यांनी स्पष्ट केले. कचरा शुल्क आकारणीचा विषय पुढील ग्रामसभेत पुन्हा मांडण्याचे ठरले. तिस्क उसगाव बाजार व परिसरात विक्रेत्यांकडून प्रायोगिक तत्त्वावर सोपो कर वसुली सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. तिराळ, मेडीतेंबी, पाचावाडा, गावकरवाडा व वाघेमळ भागात गवे व बिबट्यांचा वाढता वावर लक्षात घेऊन वन विभागाला पत्र पाठविण्याचे ठरले.

तिस्क-उसगाव येथील अत्याधुनिक बाजार प्रकल्प १२ वर्षांपासून रखडल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते नीलेश गावडे यांनी नाराजी व्यक्त केली. बालोद्यान व क्रीडांगणासाठी कोमुनिदादकडून जागा उपलब्ध होत नसल्याची माहिती पंचायत सचिवांनी दिली. पंचायत कचरा प्रकल्पातील स्मशानभूमी नागरिकांसाठी खुली करून आवश्यक नियमावली लागू करण्याची मागणीही करण्यात आली. या विषयावर पंचायत मंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल, असे सरपंच राजेंद्र नाईक यांनी सांगितले.

ग्रामसभेतील महत्त्वाचे निर्णय

उसगाव ग्रामसभेत कलम ३९-अ अंतर्गत भू-रूपांतरास विरोधाचा ठराव मंजूर करण्यात आला. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, स्थानिकांना औद्योगिक रोजगारात प्राधान्य, कचरा शुल्क प्रस्ताव पुढील समेत ठेवणे, तिस्क उसगाव बाजारात सोपो कर वसुली सुरू करणे, वन्यप्राण्यांच्या वाढत्या वावराबाबत वन विभागाला कळविणे, अत्याधुनिक बाजार प्रकल्पाला गती देणे, बालोद्यान व क्रीडांगणासाठी जागा उपलब्ध करून देणे आणि पंचायत कचरा प्रकल्पातील स्मशानभूमी नागरिकांसाठी खुली करण्याच्या मागण्या ग्रामसमेत ठळकपणे मांडण्यात आल्या

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT