पणजी : पुढारी वृत्तसेवा
अभ्यासकांच्या अलीकडील निष्कर्षांनुसार, राज्यातील महिलांमध्ये फुफ्फुसाच्या कर्करोगाचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. अप्रत्यक्ष धूम्रपानामुळे होणारे आजार आणि मृत्यू यांचे वाढते ओझे लक्षात घेता, त्याबाबत तातडीने चौकशी करण्याची गरज आहे. राज्यातील महिलांमध्ये फुफ्फुसाच्या कर्करोगाचे बदलते स्वरूप हा सार्वजनिक आरोग्यासाठी महत्त्वाचा इशारा ठरू शकतो, असे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण संस्था (नोट)चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शेखर साळकर यांनी म्हटले आहे.
डॉ. साळकर म्हणाले, अभ्यासात देशभरात १९९० पासून अप्रत्यक्ष धूम्रपानामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये जवळपास ५० टक्के वाढ झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. केवळ २०२३ मध्येच अप्रत्यक्ष धूम्रपानामुळे अंदाजे ३ लाख २५ हजार ६०० मृत्यू झाले. २०२३ मध्ये अप्रत्यक्ष धूम्रपानाच्या संपर्कात आलेल्या लोकांच्या संख्येत भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर होता.
देशातील अंदाजे ४४४ दशलक्ष लोक या संपर्कात आले होते. १९९० मध्ये ही संख्या ३७५ दशलक्ष होती. म्हणजेच त्यात सुमारे १८.४ टक्के वाढ झाली आहे. मात्र, याच कालावधीत वयानुसार प्रमाणित संसर्गाचे प्रमाण ४३.२ टक्क्यांवरून ३०.६ टक्क्यांपर्यंत घटले आहे.
अभ्यासातील निष्कर्षांनुसार, भारतात अप्रत्यक्ष धूम्रपानामुळे होणारे मृत्यू १९९० मधील अंदाजे २ लाख १७ हजारांवरून २०२३ मध्ये ३ लाख २५ हजार ६०० झाले. याच काळात महिलांमधील मृत्यू १ लाख १३ हजार ४०० वरून १ लाख ५६ हजार ९००, तर पुरुषांमधील मृत्यू १ लाख ४ हजार ३०० वरून १ लाख ६८ हजार ७०० झाले. २०२३ मध्ये अप्रत्यक्ष धूम्रपानामुळे भारतात ९२.८ लाख अपंगत्व-समायोजित आयुरमान कमी झाल्याचा अंदाजही लेखात व्यक्त करण्यात आला आहे.
अप्रत्यक्ष धूम्रपानाच्या संपर्कामुळे विविध गंभीर आजारांचा धोका वाढत असल्याचे लेखात नमूद करण्यात आले आहे. यामध्ये क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीजचा धोका ४४ टक्के, फुफ्फुसाच्या कर्करोगाचा ३७ टक्के, खालच्या श्वसनमार्गाच्या संसर्गाचा ३४ टक्के, इस्केमिक हृदयरोगाचा २६ टक्के, स्तनाच्या कर्करोगाचा २२ टक्के, दम्याचा २१ टक्के, पक्षाघाताचा १६ टक्के, टाईप-२ मधुमेहाचा १६ टक्के आणि ओटायटिस मीडियाचा १२ टक्के वाढीव धोका नोंदवण्यात आला आहे.
त्यामुळे अप्रत्यक्ष धूम्रपान ही केवळ जीवनशैलीशी संबंधित समस्या नसून, गंभीर सार्वजनिक आरोग्य समस्या असल्याचे स्पष्ट होते. राज्यातील फुफ्फुसाच्या कर्करोगाचे बदलते स्वरूप हा सार्वजनिक आरोग्यासाठी महत्त्वाचा संकेत मानला पाहिजे. यासाठी पुरावे, शास्त्रीय तपासणी आणि त्यानुसार कृती आवश्यक आहे.
विशेषतः धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तीत, त्यातही महिलेत, फुफ्फुसाचा कर्करोग आढळल्यास त्यामागे कोणते घटक कारणीभूत ठरले असतील, याचा शोध घेणे गरजेचे आहे. प्रतिबंधाची सुरुवात आजारामागील मूळ कारणे ओळखण्यापासूनच झाली पाहिजे, असे डॉ. साळकर यांनी सांगितले.