पणजी : मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरावलोकनाच्या (एसआयआर) प्रक्रियेमुळे काँग्रेसच्या निवडणुकीच्या गणितावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने पक्ष या प्रक्रियेला विरोध करत आहे. एसआयआरच्या नावाखाली देशात अराजकतेचे राजकारण केले जात असल्याचा गंभीर आरोप केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी केला.
एसआयआरच्या कदम पठार येथील भाजप मुख्य कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री शेखावत बोलत होते. यावेळी आमदार नीलेश काब्राल, रूपेश कामत व दयानंद कार्बोकर व्यासपीठावर होते. केंद्रीयमंत्री शेखावत यांनी काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना मतदार यादीच्या शुद्धीकरणाच्या प्रक्रियेबाबत पक्षाच्या भूमिकेवर टीका केली.
दरम्यान, शेखावत यांनी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबाबतही एक गंभीर दावा केला. सोनिया गांधी भारतीय नागरिक होण्यापूर्वी त्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यात आले होते, असा दावा त्यांनी केला. या मुद्द्याचा संदर्भ देत काँग्रेसला अशा प्रकारच्या मतदार यादीतील समावेशाचे समर्थन करायचे आहे, असा आरोपही शेखावत यांनी केला.
देश स्वातंत्र्य झाल्यापासून आतापर्यंत १२ वेळा एसआयआर प्रक्रिया झाली. त्यापैकी १० वेळा
काँग्रेस सत्तेवर असताना झाली. मतदार यादीमधून मृत मतदारांची नावे, स्थलांतर झालेल्यांची व अस्तित्व नसलेल्यांची नावे हटवण्यात आली आहेत. त्यामध्ये गैर काय आहे हे अगोदर काँग्रेसने स्पष्ट करावे, असा सवालही त्यांनी केला.
गोव्यात पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार असून त्यामध्ये पराभूत झाल्यानंतर काँग्रेस एसआयआर प्रक्रिया, तसेच ईव्हीएम यंत्राद्वारे घेण्यात येणाऱ्या मतदानाला दोष देणार आहे, असे शेखावत यांनी स्पष्ट केले. ही आंदोलने म्हणजे सूच्यांचे युद्ध आहे.