गोव्यातल्या नेत्यांचा संघर्ष आता दिल्ली दरबारी File Photo
गोवा

गोव्यातल्या नेत्यांचा संघर्ष आता दिल्ली दरबारी

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात मंत्रिमंडळातर्गत सुरू असलेला संघर्ष आता वाढल्याने हे प्रकरण दिल्ली दरबारी पोहोचले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांना दिल्लीत पाचरण केले आहे. या सर्वांसमवेत आज (सोमवार) रात्री दिल्लीत बैठक होणार आहे.

या बैठकीमध्ये राज्यात सुरू असलेले मेगा बांधकाम प्रकल्प, त्यांना दिलेल्या परवानग्या, नगर नियोजन व नगर विकास, महसूल, सार्वजनिक बांधकाम खात्यातील गैरव्यवहार यासह रखडलेला मंत्रिमंडळातील फेरबदल यावर चर्चा होणार असल्याची माहिती आहे. २०२२ मध्ये काँग्रेस मधून भाजपमध्ये दाखल झालेल्या अनेक आमदारांना गेल्या दोन वर्षांपासून लाभाची पदे आणि मंत्रिपदे मिळालेली नाहीत. त्यामुळे त्यांच्यातही असंतोष वाढला आहे. या शिवाय मंत्रिमंडळ अंतर्गत कुरबुरी वाढल्याने अनेक मंत्री परस्पर विरोधी आणि इतरांच्या खात्यांवरती टीकाटिपणी करत आहेत. याचा एकूणच परिणाम सावंत सरकार आणि भाजपच्या प्रतिमेवर होत असून सरकार विरोधात नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे.

दुसरीकडे विरोधक आक्रमक झाले आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा अधिवेशनात विरोधकांनी सरकारवर केलेली टीका टिपणी, त्यावर मुख्यमंत्री आणि संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी दिलेली उत्तरे या आधारावर राज्यात आणि प्रामुख्याने उत्तर भारतात मोठ्या प्रमाणामध्ये 'रील' बनवून त्या समाज माध्यमांवर प्रसारित करण्यात येत आहेत. याचाही भाजपच्या प्रतिमेवर विपरीत परिणाम होत आहे. यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी केंद्रीय मंत्री शहा, नड्डा यांच्यासोबत सविस्तर आज बैठक होत आहे. या बैठकीत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सदानंद शेट तानावडे सहभागी होतील. एकूणच मंत्रिमंडळातील फेरबदल, सत्ता संघर्ष, भाजप अंतर्गत धुसपुस, नेतृत्व बदल, विधिमंडळ नेतृत्व बदल अशा अनेक विषयांवर आज रात्री चर्चा अपेक्षित आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT