केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान Pudhari Photo
गोवा

Shivraj Singh Chouhan | केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग चौहान उद्या गोव्यात

Shivraj Singh Chouhan | जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांची माहिती ; शेतीवर करणार मार्गदर्शन

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा
केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग चौहान हे शुक्रवारी, २ ऑक्टोबरला गोव्यात येत असून, सकाळी १० वाजता फोंडा येथील सनग्रेस गार्डन सभागृहातून ते राज्यातील शेतकरी, पंच नगरसेवक व नागरिकांना आभासी पद्धतीने शेती या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती जलसिंचन खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली.

बुधवारी पर्वरी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत शिरोडकर बोलत होते. यावेळी कृषी संचालक चंद्रहास देसाई, नियोजन आणि सांख्यिकी खात्याचे संचालक विजय सक्सेना व इतर उपस्थित होते. शिरोडकर यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला कृषीसंपन्न करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यासाठी केंद्रीय कृषी खातातर्फे विविध कार्यक्रमांतून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते.

त्याचाच एक भाग म्हणून २ ऑक्टोबर रोजी फोंडा येथून शिवराज सिंग चौहान हे मार्गदर्शन करतील. यावेळी सनग्रेस सभागृहात प्रत्यक्ष दोन ते अडीच हजार शेतकरी व महिला उपस्थित राहतील. त्याचबरोबर राज्यातील सर्व पंचायती आणि पालिका त्या दिवशी खुल्या राहतील. तिथे पंच व नगरसेवकांसह स्थानिक शेतकरी, नागरिकांची उपस्थिती असेल, असे त्यांनी नमूद केले.
देशातील १२ कोटी शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान निधीच्या माध्यमातून वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात.

त्याचबरोबर राज्य सरकारच्या अनेक कृषी योजना आहेत, याची माहिती गोवा सरकारचे कृषी संचालक देतील. राज्यातील मच्छीमार उत्पादन वाढावे यासाठी मच्छीमारांना अनुदान दिले जाते. गतवर्षी एक लाख टन मासे उत्पादन झाले. ही संख्या वाढायला हवी यासाठी त्यावेळी मच्छीमारांना चौहान हे मार्गदर्शन करतील, असे शिरोडकर यांनी सांगितले.

सात कोटींची स्थानिक भाजी खरेदी:

गोवा सरकारच्या गोवा फलोत्पादन विकास महामंडळातर्फे राज्यातील स्थानिक शेतकऱ्यांनी उत्पादित केलेली सात कोटींची भाजी गेल्या वर्षभरामध्ये खरेदी केली. त्याचबरोबर सुमारे दीड कोटींची भाजी शेजारी राज्यातही पाठवली. यावरून गोव्यात भाजी उत्पादनाला मोठा वाव असल्याचे स्पष्ट होते, असे मंत्री सुभाष शिरोडकर यांनी सांगितले.गोव्यातील शेतकऱ्यांना ५ लाख झेंडूच्या फुलांची रोपे वाटपयंदा गोव्यातील शेतकऱ्यांना ५ लाख झेंडूची रोपे वितरित करण्यात आली.

प्रशिक्षण व अनुदानामुळे झेंडू लागवडीला चालना मिळत असून, गतवर्षी या पिकातून सुमारे २ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती कृषी संचालक चंद्रहास नाईक देसाई यांनी दिली.

यावर्षी १०० बंधारे बांधले:

जलसिंचन खातर्फे गेल्या वर्षभरामध्ये १०० बंधारे बांधले. ज्यामुळे राज्यातील बंधाऱ्यांची संख्या पाचशे झाली आहे. आणखीनही बंधारे बांधायचे आहेत. सध्या पाऊस बंद झालेला असल्यामुळे सर्व बंधारे बंद केले आहेत. त्यामुळे त्या त्या परिसरातील शेतकऱ्यांना बंधाऱ्यात साठलेल्या पाण्याचा लाभ घेता येईल, असे मंत्री सुभाष शिरोडकर यांनी स्पष्ट केले.

गोवा फ्रेश योजनेचे उद्घाटन:
केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते गोवा फ्रेश योजनेचे २ ऑक्टोबर रोजी उद्घाटन केले जाईल. या योजनेत स्थानिक शेतकऱ्यांनी पिकवलेल्या भाजीसह इतर उत्पादनांचे ब्रँडिंग, पॅकेजिंग करण्यात येईल. याद्वारे शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी माहिती कृषी संचालक चंद्रहास देसाई यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT