Goa Ujjwala Yojana  file photo
गोवा

Goa Ujjwala Yojana | गणेशोत्सवापूर्वी गोमंतकीयांना भेट! उज्ज्वला योजनेचा 3 हजार रुपयांचा पहिला हप्ता खात्यात जमा

Goa Ujjwala Yojana | मुख्यमंत्र्यांच्या हस्ते योजनेचा शुभारंभ : पात्र व्यक्तींना मिळणार आठ दिवसांत लाभ

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा
उज्ज्वला योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात गुरुवारी प्रत्येकी ३ हजार रुपयांचा पहिला हप्ता जमा करण्यात आला. पुढील पाच दिवस बँका बंद राहणार असल्याने नागरी पुरवठा खात्याने छाननी करून मंजूर केलेल्या अर्जांची रक्कम थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रणालीद्वारे खात्यात जमा केली आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नागरी पुरवठा खात्याचे सचिव संजीव गडकर आणि संचालक जयंत तारी यांच्या उपस्थितीत कळ दाबून या योजनेचा प्रारंभ केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील नागरिकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत उज्ज्वला योजना घराघरांत पोहोचवून दिलेला शब्द पूर्ण करत असल्याचे सांगितले.

नागरी पुरवठा आणि सामान्य प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी रात्रंदिवस काम करून हजारो अर्जांची छाननी पूर्ण केली आहे. अर्ज मंजूर झालेल्या महिलांच्या खात्यात पहिल्या टप्प्यातील ३ हजार रुपये जमा झाले असून, त्यांना संदेशही प्राप्त झाले आहेत. पुढील आठ दिवसांत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

बँकांचा संप आणि त्यानंतरच्या सार्वजनिक सुट्ट्यांमुळे सर्व लाभार्थ्यांना चतुर्थीपूर्वी योजनेचा लाभ देणे शक्य होणार नाही. मात्र, मंगळवारनंतर उर्वरित लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जाईल, असे त्यांनी सांगितले. विरोधक योजनेबाबत गोंधळ निर्माण करण्यासाठी अफवा पसरवत असल्याचा आरोप करून नागरिकांनी त्याला बळी पडू नये, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

एकदाच भरलेले अर्ज पात्र

उज्ज्वला योजनेसाठी नवीन अर्ज उपलब्ध झाले असले तरी यापूर्वी भरलेले अर्जही पात्र आहेत. त्यामुळे यापूर्वी अर्ज केलेल्यांनी पुन्हा अर्ज करू नयेत. योजनेसाठी ९९ टक्के अर्ज महिलांच्या नावाने भरले गेले आहेत. पत्नी नसलेले किंवा अविवाहित पुरुष आणि त्यांच्या नावावर गॅसजोडणी असल्यास त्यांनी स्वतःच्या नावाने केलेले अर्जही पात्र ठरतील, असे डॉ. सावंत यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT