digambar kamat 
गोवा

Digambar Kamat | पर्वरी उड्डाणपुलावर भीषण अपघातानंतर दुचाकींना प्रवेशबंदी; बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांचा निर्णय

Digambar Kamat | गिरी व मॅजेस्टिककडील सर्व्हिस रस्ता प्रवेश-निर्गमनही बंद

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा
वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेल्या पर्वरी उड्डाण पुलावर झालेल्या भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर पर्वरी उड्डाण पूल दुचाकींसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी दिली. सार्वजनिक बांधकाम खात्याने या संबंधी अधिसूचना जारी केली आहे.

कालच्या अपघातानंतर मंत्री दिगंबर कामत यांनी घटनास्थळी जाऊन तेथील रस्त्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी तातडीची बैठक घेऊन रस्ता सुरक्षेच्या उपाययोजनांचा आढावा घेतला. या बैठकीला पोलीस अधीक्षक, वाहतूक कक्ष, वाहतूक विभागाचे अधिकारी तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
भरधाव वेगाने आणि बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई करण्याचे निर्देश मंत्री कामत यांनी दिले. वाहनचालकांनी वेगमर्यादेचे पालन करावे तसेच वाहतूक व रस्ता सुरक्षेसंदर्भातील सर्व सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

उड्डाण पुलाला जोडणाऱ्या गिरी आणि मॅजेस्टिक या दोन्ही बाजूंच्या सर्व्हिस रोडवरील प्रवेश व बाहेर पडण्याचे मार्गही बंद करण्यात येणार आहेत. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे.
म्हापसाकडून पणजीच्या दिशेने जाणाऱ्यांनी मेरशी जंक्शनवरून अटल सेतूचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. तसेच म्हापसाच्या दिशेने जाणाऱ्यांनी सध्याच्या जमिनीवरील (ग्राउंड-लेव्हल) मार्गाचा वापर करावा, असे सांगण्यात आले आहे.

वेग नियंत्रक रडार; सुरक्षेच्या उपाययोजना

पर्वरी येथील नव्या उन्नत मार्गावर शनिवारी झालेल्या भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी सोमवारी या मार्गाची पाहणी करून त्या ठिकाणी वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी येथे इंटरसेप्टिंग स्पीड रडार बसविण्याचे आदेश दिले.

वेगमर्यादा ताशी ६५ किलोमीटर असूनही वेगाने तसेच निष्काळजीपणे वाहन चालवल्यामुळे अपघात घडत असल्याचे ते म्हणाले. या पुलावर वाहनचालकांच्या सुरक्षेसाठी आणखी उपाययोजना करण्यात येणार असून, अधिक स्पीड कॅमेरे आणि अन्य सुरक्षा यंत्रणा लवकरच बसविण्यात येणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT