पेडणे : पुढारी वृत्तसेवा
तेमवाडा-मोरजी समुद्रकिनारी भागात सीआरझेड नियमांच्या कथित उल्लंघन प्रकरणी बांधकामांवर सरकारी यंत्रणेने चौथ्या दिवशीही हातोडा चालवला. या कारवाई दरम्यान एकाने दोनदा आत्महत्येचा प्रयत्न केल्याने वातावरण काही काळ तंग झाले.
राजन हळदणकर यांनी राहत्या घरावर पाडकामाच्या धास्तीने सकाळी गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांच्या वेळीच हस्तक्षेपामुळे तो टळला. पण त्यानंतर सायंकाळी पुन्हा त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
त्यांना तत्काळ वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे राजन हळदणकर यांचे वडील रत्नाकर हळदणकर यांची प्रकृती बिघडली. घटनास्थळी १०८ रुग्णवाहिका दाखल होऊन वैद्यकीय पथकाने त्यांची तपासणी केली.
प्राथमिक तपासणीनंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याने त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले नाही. कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
घटनास्थळी अतिरिक्त जिल्हाधिकारी, मामलेदार, पोलिस निरीक्षक, तसेच महसूल, सीआरझेड आणि पोलिस विभागाचे अधिकारी उपस्थित राहून संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून होते.
घटनेनंतर त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता ते अत्यंत अस्वस्थ आणि मानसिकदृष्ट्या खचलेले दिसून आले. घरातील वातावरणही शोकाकुल होते. अपंग मुलाला जवळ घेऊन कुटुंबीय अश्रू ढाळत होते. या अवस्थेत त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
दरम्यान, सकाळच्या धक्कादायक घटनेनंतर हळदणकर यांच्या घराजवळ पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवत पोलिस त्यांच्यासोबतच असल्याचे चित्र परिसरात पाहायला मिळाले.
या प्रकरणाची सुरुवात तेमवाडा समुद्रकिनारी भागातील जमीनमालक अनिल प्रभाकर नाईक यांनी केलेल्या तक्रारीपासून झाली. न्यायालयाने संबंधित २३ छोट्या-मोठ्या बांधकामांवर कारवाईचे आदेश दिल्यानंतर प्रशासनाने पाडकाम मोहीम सुरू केली. याच कारवाईदरम्यान राजन हळदणकर यांच्या घरावरही हातोडा चालवण्याची प्रक्रिया सुरू झाली.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, त्यांचे मूळ पूर्वजांचे घर त्या ठिकाणी अनेक वर्षांपासून आहे. त्याच परिसरात त्यांनी कष्टाने नवीन घर उभारले होते. या घरात ते आपल्या अपंग मुलासह वास्तव्यास होते. वन खात्यात नोकरी करणारे राजन हळदणकर आयुष्यभराच्या कष्टातून उभारलेले घर उद्ध्वस्त होणार या मानसिक धक्क्यामुळे गेल्या काही दिवसांपासून प्रचंड तणावाखाली असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.