धारबांदोडा : पुढारी वृत्तसेवा
गेल्या आठवड्यात वास्को येथील चार युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज रविवारी तांबडीमळ-कुळे येथे दूधसागर नदीत आंघोळ करण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
ही घटना रविवारी सकाळी १०.३० वा. घडली. शिवलिंगप्पा दांडीन (वय १७) व सागर दांडीन (१७) अशी मृत्यू झालेल्या युवकांची नावे आहेत. दोघेही चुलत भाऊ आहेत. प्राप्त माहितीनुसार, शिवलिंगप्पा व सागर आंघोळीसाठी जात असताना कुळे पंचायत मैदानावर शिवलिंगप्पाचा लहान भाऊ खेळत होता.
शिवलिंगप्पाने लहान भावाला आंघोळीसाठी बोलावले होते. ते दोघे पुढे गेल्यावर लहान भाऊ त्यांच्या मागे गेला व त्यांना बुडताना पाहिले. म्हणून घटना उघडकीस आली. दोघांनाही पोहता येत नव्हते. ज्याठिकाणी ते पोहण्यासाठी उतरले होते तिथे खोल डोह आहे. खोलीचा अंदाज नसल्याने ते पाण्यात बुडाले असावे. या घटनेचे मागच्या आठवड्यात घडलेल्या घटनेशी कमालीचे साम्य आहे.
आजी म्हणाली, जाऊ नका !
शिवलिंगप्पा हा युवक आपल्या काकांकडे बागलकोट येथे शिक्षण घेत होता. दोन दिवसांपूर्वी तो आपला चुलत भाऊ सागर याला घेऊन कुळ्यात आला होता. रविवारी आंघोळीसाठी नदीवर जात असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांच्या आजीने त्यांना मनाई केली होती व गेल्या आठवड्यात घडलेल्या घटनेची आठवण करून दिली होती.
मूळ बागलकोट कर्नाटकातील
शिवलिंगप्पा याचे आई-वडील कुळे येथे भाड्याच्या खोलीत राहत असून, ते मूळ बागलकोट- कर्नाटकातील आहेत. कुळे पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक संदीप निंबाळकर यांनी पंचनामा केला. पुढील तपास सुरू आहे.