धारबांदोडा : गेल्या आठवड्यात वास्कोतील चार युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच रविवारी (दि. २१) सकाळी साडेदहाच्या सुमारास तांबडीमळ-कुळे येथे दूधसागर नदीत आंघोळ करण्यासाठी गेलेल्या दोन चुलतभावांचा बुडून मृत्यू झाला. शिवलिंगप्पा दंडीन (वय १७) व सागर दंडीन (वय १७) त्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, शिवलिंगप्पा व सागर आंघोळीसाठी जात असताना कुळे पंचायत मैदानावर शिवलिंगप्पाचा लहान भाऊ खेळत होता. शिवलिंगप्पाने लहान भावालाही आंघोळीसाठी बोलावले होते. ते दोघे पुढे गेल्यावर लहान भाऊ त्यांच्या मागे गेला व त्यांना बुडताना पाहिले. म्हणून घटना उघडकीस आली. दोघांनाही पोहता येत नव्हते. ते पोहण्यासाठी उतरलेल्या ठिकाणी खोल डोह आहे. खोलीचा अंदाज नसल्याने ते पाण्यात बुडाले असावेत, असा अंदाज आहे.
शिवलिंगप्पाचे आई-वडील कुळेत भाड्याच्या खोलीत राहत असून ते मूळ बागलकोटमधील आहेत. शिवलिंगप्पा आपल्या काकांकडे बागलकोटमध्ये शिक्षण घेत होता. दोन दिवसांपूर्वी तो चुलतभाऊ सागरला घेऊन कुळ्यात आला होता. रविवारी ते आंघोळीसाठी नदीवर जात असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांच्या आजीने त्यांना मनाई केली होती. तरीही ते गेले अन् जीव गमावून बसले. कुळे पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक संदीप निंबाळकर यांनी पंचनामा केला. तपास सुरु आहे.