पणजी: पुढारी वृत्तसेवा
तुये इस्पितळाचे दि. २ फेब्रुवारीला उद्घाटन केले जाणार असून हे इस्पितळ गोमेकॉला लिंक करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमवारी केली. या इस्पितळाला तुये शासकीय रुग्णालय आणि संशोधन केंद्र, तुये (जीएमसी लिंक) असे नाव देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी आरोग्य सचिव, गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिकारी, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि आरोग्य सेवा संचालनालयाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत तुये इस्पितळाच्या कामांचा आढावा घेतला.
मुख्यमंत्री म्हणाले, २ फेब्रुवारी पासून मेडिसिन, सर्जरी, अस्थिरोग, स्त्रीरोग, दंतचिकित्सा, नेत्ररोग, बालरोग, आयुष, फिजिओथेरपी, मानसोपचार, कान-नाक-घसा, रेडिओलॉजी आणि त्वचा या विभागांचे १३ बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) कार्यान्वित केले जातील.
हे वाह्यरुग्ण विभाग गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि आरोग्य सेवा संचालनालयातील डॉक्टरांद्वारे चालवले जातील. लोकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी, परिचारिका, बहु-कार्य कर्मचारी, सुविधा व्यवस्थापन आणि स्वच्छता, सुरक्षा सेवा इत्यादी सर्व आवश्यक सहाय्यक मनुष्यबळ केंद्र कार्यान्वित होण्याच्या तारखेपूर्वी तैनात केले जाईल.
मुख्यमंत्री म्हणाले, 'राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र' आणि इतर नामांकित संशोधन संस्थांच्या सहकार्याने आरोग्य सेवेमध्ये प्रगत संशोधन करण्यासाठी या केंद्रात एक समर्पित संशोधन केंद्र स्थापन करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. ऑपरेशन थिएटर कार्यान्वित करण्याचे काम आधीच सुरू असल्याने, ते ४ महिन्यांच्या आत कार्यान्वित केले जातील.